मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातल्या आरोपींना मुंबईत आणलं

October 25, 2008 4:33 AM0 commentsViews: 5

25 ऑक्टोबर, मुंबई – मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना काल रात्री उशीरा मुंबईत आणण्यात आलं. मुंबई एटीएस्‌नं या आरोपींना आणलं असून, या दरम्यान एटीएस्‌च्या पथकाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. स्फोटाच्या पुढील चौकशीकरता त्यांना मुंबईत आणण्यात आलं असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, एटीएस्‌ने याबाबतीत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.ऐन रमझानच्या महिन्यात गुजरातमधल्या मोडासा भागात बॉम्बस्फोट करण्यात आले आणि त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 29 सप्टेंबरला मालेगावात बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमागच्या गुन्हेगारांचा कसून शोध घेण्यात आला होता. पैकी मालेगावमधल्या बॉम्बस्फोटांमागे हिंदुत्त्ववादी संघटनांचा हात असल्याचं तसंच हे स्फोट त्यांनी घडवून आणल्याचं समोर आलं. खासकरून बॉम्बस्फोटांमागचा खरा सूत्रधार हिंदू जागरण मंच असल्याच्या वृत्ताला मुंबईचे पोलीस कमिश्नर हसन गफुर यांनीही दुजोरा दिला होता. हिंदू जागरण मंच हा सनातन संस्थेचा भाग आहे. यापूर्वी ठाणे आणि नवी मुंबई इथल्या स्फोटांमागे सनातन संस्थेचा हात असल्याचं पोलीस तपासात आढळलं होतं. आता या आरोपींवर काय कारवाई होणार आहे, काय शिक्षा होणार आहे याकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

close