दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागपुरात काविळीची साथ

October 25, 2008 8:35 AM0 commentsViews: 15

25 ऑक्टोबर, नागपूर – नागपूरमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे तिथल्या काही वस्त्यांमध्ये काविळीची साथ पसरली आहे. या पाण्यामध्ये क्लोरिनची मात्रा कमी प्रमाणात असल्याचं तपासणीत आढळलं आहे. दूषित पाणी आणि पाण्यातलं क्लोरिनचं कमी प्रमाण, ही बाब नागपूर महानगरपालिकेच्या लक्षात आणून दिली असता महापालिका याबाबतीत सारवासारव करत आहे. मात्र ठोस उपाय करण्यासाठी महापालिका काही पुढे येत नाही.नागपूरमधील कॉटन मार्केटमध्ये राहणारे नागरिक दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे वैतागले आहेत. त्यात इथल्या लोकांना काविळीची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या रागाचा पारा अजूनच चढला आहे. विशेष म्हणजे या भागातले नगरसेवकच काविळीने आजारी आहेत. 'गेल्या काही दिवसांपासून माझ्या विभागातले नागरिक आजारी पडत आहेत. त्यामुळे आम्ही पाण्याची चाचणी केली. तेव्हा चाचणीत पाण्यात क्लोरीनचं प्रमाण कमी असल्याचं आढळलं. माझ्या भागात 150 ते 200 जणांना काविळीची लागण झाली आहे.मलाही कावीळ झाली आहे,’ असं त्या विभागाचे नगरसेवक मनोज साबळे सांगत होते. पण नगरसेवकाचा हा दावा वैद्यकीय अधिकारी डॉ. उरकुडे यांनी खोडून काढला आहे. ते नागरिकांनाच दोष देत आहेत. 'आमच्या पाण्यामध्ये क्लोरिन आहे. आम्ही सर्व टेस्ट केल्या आहेत. नेमका आमच्या पाण्यात काही प्रॉब्लेम आहे की नागरिकांनी साठवून ठेवलेल्या पाण्यात, याची चाचणी करत आहोत,' असं डॉ. उरकुडे म्हणाले. महानगरपालिकेने नागपूरमधील वस्त्याचे सर्व्हे केले आहेत. पण समस्या मात्र कायमच आहे. 'अनेक वस्त्यांमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय. पाण्याच्या पाईप लाईन्स गटारातून गेल्या असल्या कारणानं ही समस्या निर्माण होत आहे,’ असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. पण नागरिकांचं म्हणणं महापौर माया ईवनाते यांना मान्य नाही. ‘आम्ही पावसाळ्याच्या आधी सर्व गटार लाईन बदलून घेतली आहे. कुठेही लिकेज नाही,’ असा दावा माया ईवनाते यांनी केला. पण महापौरांचा हा दावा फोल असल्याचं वस्तीत आल्यावर कळतं. अशा परिस्थितीत महानगरपालिका मात्र आकड्यांच गणित करत बसली आहे.

close