मॅच फिक्सिंग प्रकरणी चौकशी

August 30, 2010 4:55 PM0 commentsViews: 9

30 ऑगस्ट

पाकिस्तानी खेळाडूंच्या मॅच फिक्सिंगचे प्रकरण वाढण्याची चिन्हे आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या अधिकार्‍यांना लंडनला पाठवणार आहे. बुकी मजहर माजिदने आणखी काही आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये फिक्सिंग केल्याची शक्यता आहे.

त्यामुळे 80 आंतरराष्ट्रीय मॅचची यावरून चौकशी होणार आहे. तर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यादरम्यानच्या पहिल्या टेस्टमध्ये फिक्सिंग केल्याची तसेच, ऑस्ट्रेलिया सीरिजमध्येही फिक्सिंग केले गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, कोणत्याही आरोपांशिवाय माजिदची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी काल रात्री 7 पाकिस्तानी खेळाडूंची चौकशी केली. त्याचबरोबर पाक टीमचा कॅप्टन सलमान बट्ट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमेर यांचे मोबाईल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मागणी

स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडिओमध्ये दिसलेले पाकिस्तानी खेळाडू पुढच्या वन डे सीरिजमध्ये खेळू नयेत, अशी भूमिका इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतली आहे.

आज संध्याकाळी आयसीसीचे अध्यक्ष शरद पवार आणि इंग्लिश तसंच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात टेली कॉन्फरन्सिंगवर बोलणे झाले. आणि व्हिडिओसारखा स्पष्ट पुरावा असताना चौकशीसाठी थांबायचेच का, अशी भूमिका इंग्लिश बोर्डाने घेतली.

शिवाय इंग्लंडचे खेळाडूही स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या खेळांडूंशी मैदानावर खेळायला नाखूष आहेत, असंही इंग्लिश बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोलीस चौकशी पूर्ण झाल्यावर पाक बोर्ड दोषी खेळाडूंवर कारवाई करेल, असे म्हणणार्‍या शरद पवार यांनीही आता आपली भूमिका बदललेली दिसत आहे.

मोहम्मद आसिफ, मोहम्मद आमीर आणि टीमचा कॅप्टन सलमान बट्ट या तीन खेळाडूंवर कारवाई करण्याचे निर्देश पवारांनी पाक क्रिकेट बोर्डाला दिल्याचे समजते.

close