सुप्रीम कोर्टाने पवारांना फटकारले

August 31, 2010 9:46 AM0 commentsViews: 5

31 ऑगस्ट

अतिरिक्त धान्य गरिबांना वाटा, ही सूचना नाही तर आदेश होते, असे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने कृषी तसेच अन्न व नागरी पुरवठामंत्री शरद पवार यांना फटकारले आहे.

अतिरिक्त धान्य गरिबांना वाटावे, असे केवळ निरीक्षण कोर्टाने नोंदवल्याचे शरद पवार म्हटले होते. तसेच मोफत धान्य वाटणे शक्य नसल्याचेही पवार म्हणाले होते.

पण हे निरीक्षण नसून आदेश होते, असे आज सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. त्याच वेळी कोर्टाच्या आदेशाचे पालन होणे अपेक्षित असल्याचेही कोर्टाने केंद्र सरकारच्या प्रतिनिधीला सुनावले.

तसेच साखरेच्या किंमती वाढतील किंवा कमी होतील, अशा पद्धतीची वक्तव्येही जाहीरपणे करण्याची आवश्यकता नाही, असेही कोर्टाने बजावले.

केंद्राने आदेशाचे पालन करा

दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे आता तरी केंद्र सरकारने पालन करावे, अशी मागणी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली आहे.

तसेच दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या उत्पन्नाची मर्यादा आता एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणीही गडकरी यांनी केली आहे.

त्याचबरोबर सडलेल्या धान्यापैकी बरचसे धान्य हे दारुनिर्मितीसाठी विकले जात असल्याची माहिती माहिती अधिकारांतर्गत उघड झाल्याचा आरोपही गडकरींनी केला आहे.

close