औरंगाबादमध्ये नागरी सुविधांचा बोजवारा

October 25, 2008 8:55 AM0 commentsViews: 6

25 ऑक्टोबर, औरंगाबाद – वाढत्या व्यापारामुळे औरंगाबाद शहरात मोठमोठे मॉल बांधले जात आहेत. एकंदरीतच हे विकास होत असल्याचं चित्र आहे. पण वरवरचं. कारण दुसरीकडे औरंगाबाद शहरात दोन लाख लोकसंख्या असणा-या 53 झोपडपट्टीतले नागरिक अडचणीचं जीवन जगत आहेत. औरंगाबादच्या मिरसवाडीत राहणारे पाशु पटेल यांची परिस्थिती काही वेगळी नाही. ते राहतात त्या परिसरांतलं सांडपाणी कित्येक दिवसांपासून रस्त्यांवरून वाहत आहे. चौदा हजार लोकसंख्या असणा-या या मिरसवाडी परिसरांत कुठेही ड्रेनेज लाईन नाही. अशीच अवस्था शहरातील झोपडपट्टयांची झाली आहे. '20 ते 25 वर्षांपासून मी इथे राहत आहे. पिण्याच्या पाण्याची चणचण सतत आम्हाला जाणवते आणि पावसाळ्यात मात्र इथे चालता येत नाही. सुविधेच्या नावाखाली आम्हाला मिळतायत फक्त आश्वासनं' पाशू पटेल आपली व्यथा सांगताना खूप व्याकुळ झाले होते. सुविधेच्या नावाखाली नागरिकांना फक्त आश्वासनच मिळतायत का , असं नगरसेविका शंकुतला इंगळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, 'आम्हाला विकास करायचा आहे, पण महापालिका बजेटच देत नाही. त्यामुळे रस्ते, पाणी, ड्रेनजची समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत आहे.' औरंगाबाद महापालिकेवर नगरसेवकांनी केलेल्या आरोपाला प्रत्युतर देताना महापौर विजया रहाटकर म्हणाल्या, 'स्लम एरियाचा विकास होत आहे. त्यासाठी ठराविक बजेटही ठरवलं आहे. त्या अनुषंगाने पैसा खर्चही होत आहे. म्हणजे नागरी सुविधांवर पुरेसे प्रयत्न होत आहेत. पण शहरात येणा-या लोंढ्यांमुळे सुविधा पुर्ण होण्यसाठी अडचणी येत आहेत.' महापालिकेने कितीही कारणं दिली असली तरी प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळीच आहे. स्लम एरियाच्या विकासासाठी महापालिकेने अगदी तुटपंुजी रक्कम ठेवली आहे. त्याचा परिणाम नागरिक भोगत आहेत. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळेच शहारातल्या नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे नागरिकांचंआरोग्य धोक्यात येत आहे. तसंच औरंगाबाद शहरातील झोपडपट्यांच्या विकासासाठी कोणतीही कालबद्ध योजना नाही आणि ण्नागरिकांच्या समस्या ऐकणारा सध्यातरी कुणी नाही आहे, हेही समोर आलं आहे.

close