गोविंदांचा जीव टांगणीला

September 1, 2010 1:29 PM0 commentsViews: 9

उदय जाधव

1 सप्टेंबर

दहिहंडी उत्सवात मानवी थरावर थर रचून, उंच दहिहंड्या फोडणारे गोविंदा अनेक वेळा जखमी होतात. काही वेळा अगदी जीवावर देखिल बेतते. एकीकडे मोठमोठ्या रकमेची बक्षिसे आणि ती मिळवण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये लागलेली चढाओढ यामुळे गोविंदांचा जीव धोक्यात आहे.

पण दहिहंडीच्या धूमधडाक्यात सगळेच यातील धोक्याकडे दुर्लक्ष करतात. गेल्या वर्षी दहिहंडी फोडताना, भोईवाड्यात राहणार्‍या प्रवीण भुवड या अकरावीच्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. भोईवाड्यातल्या नवतरुण गोविंदा मंडळात तो पाचव्या थरावर असायचा.

दहिहंडी फोडताना आपल्याच सहकार्‍याचा झालेल्या मृत्यूने, नवतरुण गोविंदा मंडळाचा उत्सवच बंद झाला आहे. या वर्षी उंच दहिहंड्या फोडण्यासाठी मोठ्या रकमेच्या दहिहंडी उभारल्या आहेत. आणि त्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांचा सरावही सुरू आहे. पण आता या उंच थरांना गोविंदाही विरोध करु लागले आहेत.

दहिहंडी उत्सव साजरा करताना जल्लोषात साजरा केलाच पाहिजे पण यात कोणालाही दुखापत न होण्याची खबरदारी घेतला पाहिजे. त्याचबरोबर आयोजकांनीही किती उंच दहीहंडी ठेवावी याचाही विचार करण्याची गरज आता व्यक्त होऊ लागली आहे.

close