मुंबई रंगली गोविंदा रंगात

September 2, 2010 1:59 PM0 commentsViews: 12

2 सप्टेंबर

संपूर्ण राज्यात आणि विशेषत: मुंबईनगरीत आज दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी झाली. दादर, ठाणे, वरळी, बोरिवली, डोंबिवली या ठिकाणच्या भव्य दंहीहंड्या पाहण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती.

ठाण्यातील संघर्षची मानाची दहीहंडी फोडली, माझगावच्या जय-जवान मित्रमंडळाने. पहिल्यांदा त्यांनी नऊ थर लावून सलामी दिली आणि दुसर्‍याच फटक्यात त्यांनी पुन्हा एकदा नऊ थर लावत सोन्याचा मुलामा दिलेली दहिहंडी फोडत 15 लाखांचे बक्षीसही पटकावले.

हॉस्पिटल्समध्येही गर्दी

एकीककडे उंचच उंच थर लावून दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईत गोविंदांमध्ये चढाओढ लागली होती. तर दुसरीकडे हॉस्पिटल्समध्येही जखमी गोविंदांची रिघ लागली होती. त्यांच्यावर तातडीने उपचारही केले जात होते. आत्तापर्यंत 44 गोविंदा जखमी झाले.

घाटकोपरमध्ये नेत्रदान शिबीर

घाटकोपरला राम कदम मित्र मंडळाची दहीहंडी सुरू असतानाच नेत्रदान शिबीरही सुरू होते. तिथेही गोविंदांनी नावनोंदणीसाठी रिघ लावली होती.

स्टार्सची उपस्थिती

ठाण्याच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात अनेक फिल्म स्टार्सनी उपस्थिती लावली. वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवलेल्या तेजस्विनी सावंतने या दहिहंडीला भेट दिली. यावेळी तिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी अभिनेता आदेश बांदेकरनेही हजेरी लावली.

मनसेचे आमदार राम कदम यांच्या विक्रोळीतील दहीहंडीसाठी ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांनी हजेरी लावली. आपल्या खास अंदाजात डान्स करून त्यांनी या उत्सवाची शोभाही वाढवली.

तर अभिनेते जॅकी श्रॉफनेही गोविंदांच्या उत्साहाला सलाम करण्यासाठी प्रताप सरनाईक यांच्या संस्कृतीदहीहंडीत हजेरी लावली.

अभिनेत्री प्राची देसाईनेही संस्कृतीच्या दहीहंडीत हजेरी लावली.

मराठी कलाकारांबरोबरच हिंदी स्टार्सही दहीहंडीची मजा लुटण्यासाठी दहीहंडीत सहभागी झाले. अभिनेता आफताब शिवदासानी वरळीच्या संकल्प दहीहंडीच्या ठिकाणी आला होता.

'अगडबंब'चे प्रमोशन

या उत्सवात प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या अगडबंब सिनेमाचे प्रमोेशन करण्यात आले.

पेशंटसोबत दहीहंडी

दहीहंडी उत्सवानिमीत्ताने सामाजिक बांधिलकी जपण्याचाही प्रयत्न केला गेला. 'पुणे विचारपीठा'ने हा उत्सव साजरा केला पेशंटसोबत. हॉस्पिटल्समध्ये उपचार घेणार्‍या पेशंटना या उत्सवापासून वंचित राहावे लागू नये यासाठी त्यांनाही दहीहंडीमध्ये सहभागी करून घेतले गेले.

close