नवी मुंबई विमानतळासाठी सरकार आग्रही

September 3, 2010 10:04 AM0 commentsViews: 2

3 सप्टेंबर

नवी मुंबई विमानतळाच्या मुद्द्यावर राज्य सरकार आग्रही असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांची आज दिल्लीत भेट घेतली.

नवी मुंबई एअरपोर्टचा प्रकल्प महत्त्वाचा असून, तो पूर्ण व्हावा यासाठी काही मुद्द्यांवर तडजोड करण्याचीही तयारी असल्याचे, त्यनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याचा आक्षेप पर्यावरणवाद्यांनी घेतला होता. त्यामुळे प्रकल्पाबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी आक्षेप घेतला होता.

पर्यावरणाची किंमत मोजून एअरपोर्ट होणार नाही, असे जयराम रमेश यांनी म्हटले होते. त्यामुळे एअरपोर्ट प्रकल्पाचे भवितव्य अनिश्चित झाले होते.

त्यानंतर शिवसेनेने कल्याणची पर्यायी जागा एअरपोर्टसाठी सुचवली होती. मात्र, दुसर्‍या जागेवर एअरपोर्ट होणे शक्य नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेने पुढे केलेल्या पर्यायाचा मुद्दाही खोडून काढला.

पंतप्रधांनांनाही या प्रकल्पाचे महत्त्व पटवून दिल्याचे त्यांनी सांगितले. एअरपोर्टच्या प्रश्नात स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

close