बीपीटी बंदर बंद होण्याच्या मार्गावर

September 6, 2010 10:26 AM0 commentsViews: 3

विनय म्हात्रे, नवी मुंबई

6 सप्टेंबर

सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेले बीपीटी बंदर आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. बीपीटीवरचा ताण कमी करण्यासाठी जेएनपीटी बंदर वसवण्यात आले.

कमी कालावधीत जेएनपीटी बंदराने जगातील मोठ्या बंदरांच्या यादीत स्थानही मिळवले आहे. पण ढिसाळ कारभार आणि निधी असूनही आधुनिकीकरणाचे बंदर व्यवस्थापनाला असलेले वावडे, यामुळे फक्त 20 वर्षांतच या बंदराची बीपीटीसारखी अवस्था झाली आहे.

जेएनपीटी, उरणच्या किनारपट्टीवर वसलेले बंदर. सुरुवातीला या बंदरात 15 लाख कंटेनरची हाताळणी केली जात होती. पण दहा वर्षांनंतर या ठिकाणी पियांडो आणि गेट वे ही दोन खासगी बंदरे विकसित झाली. आणि तेव्हापासूनच जेएनपीटीला घरघर लागली.

पियांडो बंदरात 650 कामगार काम करतात आणि तिथे 15 लाख कंटेनरची हाताळणी होते. तर, गेट वे बंदरही 650 कामगारांमध्ये 17 लाख कंटेनरची हाताळणी करते. याउलट, जेएनपीटीत 1800 कामगार असूनही तिथे फक्त 8 लाख कंटेनरची हाताळणी होते. असे असूनही 570 कोटी रुपयांचा नफा झाल्याचेे जेएनपीटी सांगत आहे. पण या नफ्यातील 90 टक्के वाटा 2 खासगी बंदरांतून मिळणार्‍या भाड्याचा आहे.

पियांडो भाड्यापोटी जेएनपीटीला वर्षाला 280 कोटी, तर गेट वे 250 कोटी रुपये देते. खाजगी बंदरात अत्याधुनिक क्रेन असल्यामुळे कंटेनरची हाताळणी मोठ्या प्रमाणावर होते. जेएनपीटी मात्र अजून जुन्याच क्रेनवर काम चालवत आहे.

गेल्या 5 वर्षांपासून नव्या क्रेन्स आणाव्यात म्हणून केंद्रीय शिपींग मंत्रालयाकडे जेएनपीटी व्यवस्थापन पाठपुरावा करत आहे. शिपींग मंत्रालय मात्र, याकडे काणाडोळा करत आहे.

पियांडो आणि गेटवे या बंदरांना मिळणारा व्यवसाय हा जेएनपीटीचाच असून जेएनपीटी व्यवस्थापन खाजगीकरणाच्या दिशेने पाऊल उचलत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.

आता येत्या काही महिन्यांत जेएनपीटीत चौथे खासगी बंदर सुरू होणार आहे. पण हे बंदरदेखील जेएनपीटीच्याच व्यवसायावर डल्ला मारणार आहे. तसेच या बंदरामुळे एकूण जेएनपीटीतील कंटेनरची हाताळणी वाढेल. पण जेएनपीटी मात्र बंद होण्याची भीती कामगारांना वाटत आहे.

close