विलासराव झाले पुन्हा सक्रीय

September 10, 2010 11:15 AM0 commentsViews: 5

आशिष जाधव, मुंबई

10 सप्टेंबर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत. मुख्यमंत्र्याच्या विरोधात कारवाया करण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाच्या जागी आपल्या समर्थकाची वर्णी लागावी, म्हणून विलासराव देशमुख यांनी मोठी राजकीय कवायत सुरू केली आहे. त्यामुळे 17 सप्टेंबरला होणारी प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक मोठी उत्सुकतेची बनली आहे.

दिल्लीतल्या राजकारणात जम बसवल्यानंतर विलासरावांनी आता प्रदेश काँग्रेस आपल्या हातात घेण्यासाठी सोंगट्या हलवायला सुरूवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष पद आपल्या गटाकडे यावे, यासाठी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी दिल्लीत मोठी फिल्डिंग लावली आहे. गेल्या महिना- दीड महिन्यात त्यांनी मोठ्या राजकीय चाली रचल्या…गेल्या आठवड्यात तर विलासरावांनी माणिकराव ठाकरे यांचीसुद्धा भेट घेतली. या भेटीत काही वेगळेच राजकारण शिजल्याची चर्चा आहे.

अगदी शेवटच्या क्षणी, विलासरावांचा उजवा हात समजले जाणारे आमदार उल्हास पवार यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी पुढे आले आहे. उल्हास पवार किंवा नाईलाजच झाला तर शिवाजीराव मोघे यांच्या नावावर सर्वसहमती बनवण्यासाठी विलासरावांनी दिल्लीत आपले सर्व वजन वापरायचे ठरवले आहे. त्यामुळंच प्रदेशाध्यक्षपदाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री अशोक चव्हाणसुद्धा मोजून मापून बोलत आहेत.

खरे तर, माणिकराव ठाकरेंना आता राज्य मंत्रिमंडळात यायचे आहे. पण मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा माणिकरावांच्या नावाला विरोध आहे. त्यामुळेच विलासरावांच्या गोटात सामिल होऊन खुर्ची बदलवण्याचा माणिकरावांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

close