सरकारी मदतीशिवाय हिमोफेलीयावर उपचार

September 14, 2010 1:30 PM0 commentsViews: 7

अद्वैत मेहता, पुणे14 सप्टेंबर

रक्तस्त्राव झाल्यानंतर रक्त न गोठल्याने होणारा आजार म्हणजे हिमोफेलिया. या आजारामुळे आपले सांधे निकामी होऊन कायमचे अपंगत्व येण्याची भीती असते.

या आजारावर उपचार करणारी एकमेव संस्था आहे, ती म्हणजे हिमोफेलीया सोसायटी ऑफ महाराष्ट्र. गेली 18 वर्षं ही संस्था सरकारी मदतीशिवाय सामान्यांना महागडे उपचार माफक दरात पुरवते आहे.

गुणसूत्रातील दोषांमुळे हा आजार एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जातो. सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये यावर उपचार होत नाहीत.

म्हणूनच मुकेशचे पालक हॉस्पिटल्समध्ये खेटे घातल्यावर चिंचवडच्या हिमोफेलीया सोसायटीत आले. गेले 2 महिने मुकेश या संस्थेत उपचार घेत आहे.

या आजारात पेशंटला वरचेवर फॅक्ट 8 किंवा 9 ची इंजक्शन्स द्यावी लागतात. अगदी आयडीयल सिच्युएशन बघितली. तर अमेरिकेत किंवा युरोपमध्ये सरकारमार्फत मोफत इंजेक्शन्स आणि तीही घरी जाऊन दिली जातात. किंवा पेशंटना ट्रेनिंग दिले जाते.

भारतात इंजक्शनच्या एका डोसची किंमत आहे -10 ते 15 हजार. पण इथे सब्सिडाईज्ड किंमतीत उपचार केल्याने पेशंटना दिलासा मिळतो. महाराष्ट्रात हिमोफेलियाचे अडीच हजार पेशंट आहेत.

तर भारतात 1 लाख पेशंट आहेत. संस्था फक्त 14 हजार पेशंटपर्यंत गेल्या 25 वर्षात पोहचली आहे. भारतात उत्तर प्रदेश, बिहार, पाँडेचरी, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक इथे मोफत उपचार केले जातात. पण महाराष्ट्रात याबाबत सरकारी अनास्था आहे.

इतर 5 राज्यांसारखा हा आर्थिक वाटा खरे तर राज्य सरकारने उचलावा, अशी संस्थेची मागणी आहे. हिमोफेलीया या दुर्धर आजाराशी चिकाटीने लढणार्‍यांच्या या मागणीला समाजातील संवेदनशील आणि जागरूक लोकांचा पाठींबा हवा आहे.

हिमोफेलिया सोसायटीला तुम्ही मदत करु शकता. मदतीसाठी संपर्क करा पुढील पत्त्यावर :

हिमोफेलिया सोसायटी ऑफ महाराष्ट्र केअर आणि रिसर्च सेंटर, एम.बी. क्लासिक, तळमजला, लोहाडे हॉस्पिटलसमोर,टेल्को रोडचिंचवड, पुणेफोन नंबर : 020-27462221 020-2748766

close