संघाकडून पुन्हा मंदिराचा पुनरुच्चार

September 14, 2010 5:02 PM0 commentsViews: 2

आशिष दीक्षित, दिल्ली

14 सप्टेंबर

अयोध्येतील वादग्रस्त जागेबाबतचा निकाल लागायला अजून 10 दिवस शिल्लक आहेत. पण आतापासूनच वातावरण तापायला लागले आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मंदिर बांधण्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

तसेच त्यांनी मुसलमानांनाही मंदिर बांधण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. तर दुसरीकडे हा निकाल पुढे ढकलावा, अशी मागणी करणारी याचिका आज अलाहाबाद हायकोर्टाने दाखल करून घेतली आहे.

अयोध्येतील वादग्रस्त जागा नेमकी कुणाच्या मालकीची आहे याविषयीचा निकाल 10 दिवसांनंतर म्हणजे 24 सप्टेंबरला लागणार आहे. अयोध्येचा मुद्दा देशाच्या केंद्रस्थानी आणणारा संघ परिवार त्यामुळे पुन्हा सक्रीय झाला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत स्पष्ट केलं की मंदिर बांधण्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत.

एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, 'या राष्ट्राची ओळख रामावर आधारलेली आहे. अयोध्येत राम मंदिर बांधल्याने अनेक समस्या सुटतील. समाजात संशयाचे वातावरण आहे. जर मुसलमानांनीही मंदिर बांधायला मदत केली, तर त्यांच्याकडे यापुढे कुणीही संशयाच्या नजरेने बघणार नाही.'

निकालानंतर आमच्याकडून कुठलीही हिंसा होणार नाही, असे आश्वासन सरसंघचालकांनी दिले असले, तरी त्यामुळे सुरक्षा यंत्रणांचे समाधान झालेले नाही. अयोध्या आणि पूर्ण उत्तर प्रदेशात विशेष बंदोबस्त लावण्यात येत आहे. पण कोर्टाच्या निकालाचे देशभर पडसाद उमटले, तर त्याचा विपरीत परिणाम कॉमनवेल्थ खेळांवर होईल. आणि म्हणून हा निकाल पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी दोन याचिकाकर्त्यांनी केली आहे.

तब्बल 60 वर्षांपासून सुरू असलेल्या अयोध्या केसचा निकाल पुढे ढकलण्याबद्दलचा निर्णय हायकोर्ट येत्या 17 तारखेला देणार आहे. पण या केसची सुनावणी करणार्‍या तीन पैकी एक न्यायाधीश एक ऑक्टोबरला निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल पुढे ढकलावा लागला तर कोर्टाच्या दृष्टीने ते गैरसोयीचे होऊ शकते.

close