कोल्हापुरात निवडणुकीची मोर्चे बांधणी

September 16, 2010 2:08 PM0 commentsViews: 76

प्रताप नाईक, कोल्हापूर 16 सप्टेंबर

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पण काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा फटका या निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोल्हापुरात यासाठी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि महादेवराव महाडीक या दोघांचे हात उंचावले. आणि काँग्रेस या निवडणुकीत ताकदिनिशी उतरल्याचे दाखवून दिले.

पण याच सभेत आमदार महादेवराव महाडीक यांनी मात्र सतेज पाटील यांना टोले हाणले आणि आपल्या वर्चस्वाची जाणीव करून दिली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत महाडीक यांनी आपल्या पुतण्या धनंजय महाडीक यांना सतेज पाटील यांच्या विरोधात उभे केले. त्यामुळे त्यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.

काँग्रेसच्या डझनभर नेत्यांच्या हजेरीतच या नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात भाषणे केली. गणेशोत्सवाच्या एका कार्यक्रमात आमदार महादेवराव माहाडीक यांनी पुन्हा एकदा सतेज पाटील यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले आहे.

या नेत्यांमधील वादाचा फायदा घेण्यासाठी शिवसेना टपलेलीच आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच या नेत्यांच्या वादावर वेळीच पडदा टाकण्याची आवश्यकता आहे.

close