कोर्टावर भ्रष्टाचाराचा आरोप

September 16, 2010 5:56 PM0 commentsViews: 2

16 सप्टेंबर

न्यायव्यवस्था हे सर्वसामान्य नागरिकांचे शेवटचे आशास्थान. पण आता न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराची चर्चा सुरू झाली आहे. देशातील 16 पैकी 8 माजी सरन्यायाधीश भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप माजी कायदामंत्री शांतीभूषण यांनी सुप्रीम कोर्टात दिलेल्या उत्तरात केला आहे.

माजी कायदामंत्री शांतीभूषण यांनीच आता देशातील न्यायव्यस्थेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवल आहे. देशातील 8 माजी सरन्यायाधीश भ्रष्टाचारी होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. तहलका मॅगझिनमध्ये त्यांनी भ्रष्टाचारी न्यायाधीशांबद्दल एक लेख लिहिला होता. त्यावरच्या खटल्यात कोर्टाने त्यांच्याकडून उत्तर मागितले होते.

त्यावर शांतीभूषण यांनी कोर्टात एक अर्ज सादर केला. त्यात त्यांनी म्हटले आहे, की देशातील 16 पैकी 8 सरन्यायाधीश भ्रष्टाचारी होते. 16 पैकी फक्त 6 सरन्यायाधीश प्रामाणिक होते. तर इतर दोन सरन्यायाधीशांबद्दल आपण सांगू शकत नाही, असे ते म्हणतात. तसेच भ्रष्टाचारी माजी सरन्यायाधीशांची नावेही त्यांनी अर्जात दिली आहेत.

आपल्यापूर्वीचे सरन्यायाधीश कसे भ्रष्टाचारी होते, याचे किस्से काही न्यायाधीशांनीच सांगितल्याचा दावा शांतीभूषण यांनी केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून न्यायवस्थेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा वारंवार उपस्थित होत आहे.केवळ हायकोर्टातीलच नव्हे तर सुप्रीम कोर्टातील अनेक आजी-माजी न्यायाधीशांवर गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. त्यातील बहुतेक आर्थिक आणि भूखंड गैरव्यवहाराचे आहेत.

कर्नाटक हायकोर्टाचे न्यायाधीश दिनकरन यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेचे आरोप झाले आहेत.

न्यायमूर्ती जगदीश भल्ला यांच्यावर भूखंड गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत.

पंजाब-हरयाणा हायकोर्टाचे न्यायमूर्ती निर्मल यादव 'कॅश-ऍट-डूअर्स जजेस' प्रकरणात चर्चेत आले.

तर सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश तरुण मुखर्जी फैजाबाद पीएफ प्रकरणात चर्चेत आले.

माजी न्यायमंत्र्यांनीच आरोप केल्याने आता न्यायाधीशांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अशा प्रकारांमुळे मोठ्या अपेक्षेने कोर्टाचे दरवाजे ठोठावणार्‍या सर्वसामान्य माणसाचा न्यायसंस्थेवरचा विश्वास मात्र डळमळीत होण्याची शक्यता आहे.

close