पंतप्रधानांच्या दौर्‍याची शहाद्यात धामधूम

September 18, 2010 1:15 PM0 commentsViews: 2

रणजीत रजपूत, नंदुरबार

18 सप्टेंबर

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेंभली, चांदसैली आणि नवलपूर या तीन गावांचे रूप झपाट्याने बदलत आहे. ही गावे नेमकी कुठे आहेत हे शोधून त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणेमध्ये चुरस लागली आहे. आणि कारण आहे ते पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नियोजित दौर्‍याचे. 29 सप्टेंबरला पंतप्रधान या गावांमध्ये येणार आहेत.

येथील टेंभली गावाचे भाग्य अचानक उजळले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून टेंभलीकरांची खावटी कर्जाची प्रकरणं लाल फितीत अडकली होती. अनेक हेलपाटे झाले, पण कर्ज काही मिळत नव्हते. अचानक आता त्यांना खास गाडीने शहाद्यात नेऊन कर्जाचे वाटप करण्यात आले.

हा चमत्कार घडला तो पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नियोजित दौर्‍यामुळे. युनिक आयडेंटीफिकेशन कोड या क्रांतिकारी योजनेच्या उद्घाटनासाठी मध्यप्रदेश आणि गुजरातच्या सीमेवरच्या टेंभली, चांदसैली आणि नवलपूर या तीन गावांची निवड करण्यात आली आहे.

त्यासाठी खुद्द पंतप्रधानच येणार असल्याने गावांचा विकास करण्यासाठी प्रशासन धडपडसुरू आहे. एका रात्रीत रस्ते बांधले जात आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाची डागडुजी होत आहे. रेशनवर धान्य पोहोचले आहे. इतकेच नाही, तर घराघरापुढे शौचालयही बांधली जात आहेत.

पंतप्रधानांच्या दौर्‍यासाठी चाललेल्या या सरकारी धापवळीने येथील आदिवासी मात्र भांबावले आहेत.

close