कोण होणार प्रदेशाध्यक्ष?

September 19, 2010 4:42 PM0 commentsViews: 3

19 सप्टेंबर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता खर्‍या अर्थाने चुरस निर्माण झाली. कारण विलासराव समर्थक उल्हास पवार यांनी आपली दावेदारी जाहीर केली आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेटही घेतली.

प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आता खर्‍या अर्थाने रंग भरत आहे. माणिकराव ठाकरे विरुद्ध उल्हास पवार असे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

उल्हास पवारांनी चक्क दिल्लीत प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आपली दावेदारी जाहीर केली. एवढंच नाही तर माणिकरावांच्या कामावर नाराजीसुद्धा व्यक्त केली.

विलासराव देशमुखांनी आपले सगळे वजन उल्हास पवारांच्या पारड्यात टाकल्याने माणिकराव ठाकरे अस्वस्थ झाले आहे.

त्यांना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पाठिंबा असला तरी, ते सर्वशक्तीनिशी माणिकरावांच्या पाठिशी उभे राहायला तयार नाहीत. पण असे असले तरी आपले पद कायम राहील, असा विश्वास माणिकरावांना अजूनही आहे.

मुरब्बी विलासरावांनी मोठ्या शिताफीने प्रदेशाध्यक्ष ठरवण्याचे सर्वाधिकार सोनिया गांधींना देण्याचा ठराव मंजूर करून घेतला. आता त्यांनी आपल्या उमेदवाराला थेट दहा जनपथवर धाडून लॉबिंग सुरू केले.

नवा प्रदेशाध्यक्ष कोणीही झाला, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने विलासराव देशमुख राज्याच्या राजकारणात सक्रीय झाले, एवढे मात्र नक्की आहे.

close