अयोध्येत कडेकोट सुरक्षा

September 23, 2010 9:24 AM0 commentsViews: 1

23 सप्टेंबर

अयोध्येतील निकालप्रकरणी रमेशचंद्र त्रिपाठी यांच्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात आज सुनावणी होत आहे. 24 तारखेचा म्हणजे उद्याचा निकाल पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. याआधी अलाहाबाद हाय कोर्टाच्या लखनौ खंडपीठाने ही याचिका फेटाळली होती. त्यावर आता सुप्रीम कोर्टाचे विशेष कोर्ट काय निर्णय देणार तेही महत्त्वाचे आहे.

खबरदारीचे उपाय

अयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीचा निकाल उद्या लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुरक्षेची खबरदारी घेतली आहे. सावधगिरीचे उपाय म्हणून पुढच्या 72 तासांसाठी बल्क एसएमएस आणि एमएमएसवर देशभरात बंदी घालण्यात आली आहे.

तर उत्तरप्रदेशात 26 तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या रॅली आणि मोर्चे काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील 19 संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. संवेदनशील भागातील शाळा आणि कॉलेजेसना 24 आणि 25 तारखांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

24 तारखेला कोणताही खटला नसलेल्या वकिलांनी कोर्टात येऊ नये, अशा सूचना अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाच्या रजिस्ट्रारनी दिल्या आहेत.

नागपुरात फ्लॅग मार्च

अयोध्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा दलांनी आज नागपुरात फ्लॅग मार्च केला. नागपुरात संघ मुख्यालय असल्याने विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी हा फ्लॅग मार्च असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. संवेदनशील भागात वॉच टॉवर आणि सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. एसआरपीएफ कंमांडो तसेच शहर पोलीसही यात सहभागी झाले होते.

close