‘आयोजकत्व देणे ही चूक…’

September 24, 2010 9:16 AM0 commentsViews: 6

24 सप्टेंबर

कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनावर ऑस्ट्रेलियाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारताकडे कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन देऊन चूक केली, असे ऑस्ट्रेलियन ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष जॉन कोट्स यांनी म्हटले आहे.

भारतात कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनामध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे तसेच दिरंगाईमुळे गेम्सची प्रतिष्ठा धुळीस मिळाल्याची टीकाही त्यांनी केली आहे.पण दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्याच कॉमनवेल्थ संघटनेने मात्र भारताच्या आयोजनावर समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रीडाविश्वातच मतभेद असल्याचे उघड झाले आहे.

खेळाडूंची माघार सुरू

कॉमनवेल्थ स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय खेळाडू माघार घेत आहेत. त्यातचे आज आणखी काही ऍथलिट्सनी या स्पर्धेतून माघार घेतली. चार वर्ल्ड चॅम्पियन ब्रिटीश सायकलपटू आणि न्यूझिलंडचा सायकलपटू हेंडरसन यानी आज माघार घेतली.

डेंग्यूची साथ आणि कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजची परिस्थिती तसेच भारतातील सुरक्षा व्यवस्था पाहता, या खेळाडूंनी स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हेडंरसन न्यूझिलंडचा सायकलपटू आहे. कॉमनवेल्थमध्ये भाग घेणे म्हणजे धोका असल्याचे हेंडरसन याने न्यूझिलंड सायकलिंग समितीला कळवले आहे. नेहरु स्टेडियमध्ये झालेल्या अपघातामुळे हेंडरसन चिंतीत झाला होता.

इंग्लडचे खेळाडू दिल्लीत

दरम्यान कॉमनवेल्थ गेम्ससाठी इंग्लंडचे खेळाडूआज दिल्लीत पोहोचले. नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले. 61 जणांच्या या टीममध्ये खेळाडू आणि कोचेसचा समावेश आहे.

इंग्लंडचे तब्बल 551 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर न्यूझिलंडची टीमसुद्धा या स्पर्धेत सहभागी होणार आहे. न्यूझिलंड ऑलिम्पिक समितीने हा निर्णय घेतला आहे.

समितीचे अध्यक्ष माईक स्टॅनले यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या बातम्यांमुळे कॉमनवेल्थ आयोजन समितीला मात्र काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

पण गेम्स व्हिलेजमध्ये न राहता त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअगोदर सुरेश कलमाडी यांनी आज सकाळी गेम व्हिलेजला भेट दिली. आज या गेम व्हिलेजचा ताबा डीडीएकडून दिल्ली सरकारकडे दिला जाणार आहे.

close