शेतकरी आत्महत्येचा गुन्हा साडेचार वर्षांनी दाखल

September 24, 2010 11:33 AM0 commentsViews: 3

प्रवीण मनोहर, अमरावती

24 सप्टेंबर

शेतकर्‍यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या सावकारांची गय केली जाणार नाही, सावकारांवर कडक कारवाई करू, अशी भाषा सरकारनेअनेकदा केली.

पण वास्तव मात्र वेगळेच आहे. अमरावती जिल्ह्यातील एका शेतकर्‍याच्या आत्महत्येप्रकरणी तब्बल साडेचार वर्षांनंतर गुन्हा दाखल झाला आहे.

अंजनगाव तालुक्यातील खिराडा गावच्या साहेबराव अढाऊ या शेतकर्‍याने 2006 मध्ये आत्महत्या केली. त्यांच्या मृतदेहाजवळ एक पत्रही सापडले.

मात्र पोलिसांनी आरोपी-विरोधात गुन्हा दाखल केला नाही. न्याय मिळवण्यासाठी साहेबराव यांचा मुलगा अशोक अढाऊ यांनी हायकोर्टात धाव घेतली.

अखेर तब्बल साडेचार वर्षांनंतर आता त्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पत्र तपासणीला पाठवून वेळ मारून नेली. पण पत्र तपासणीला पाठवण्याची गरज नव्हती, असे फिर्यादीच्या वकिलांचे म्हणणे आहे.

साहेबराव अढाऊ यांनी मुलाच्या लग्नासाठी 40 हजार रूपयांचं कर्ज सुधीर अढाऊ या सावकाराकडून घेतले होते. त्याबदल्यात सावकाराने त्यांची साडेतीन एकर शेती लिहून घेतली.

साहेबरावांनी 31 हजारांची परतफेडही केली. घरातील कर्ता माणूस गेला, हातची शेती गेली, घरही गहाण..अशा परिस्थितीत या परिवाराला लढायचे आहे, ते सावकारांशी.

पण पोलिसांच्या बेपर्वा वृत्तीमुळे मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबाला इतक्या वर्षांनंतर तरी न्याय मिळेल का, याबद्दल शंका व्यक्त होत आहे.

close