राहुल राज प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

October 28, 2008 8:08 AM0 commentsViews: 7

28 ऑक्टोबर, मुंबई बेस्ट बसमध्ये गोळीबार करणार्‍या राहुल राजच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिले आहेत. राहुलच्या मृत्यूचं राजकारण करत बिहारचे सर्वपक्षीय नेते आता एकत्र आले आहेत. बिहारच्या नेत्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन शिवसेना आणि मनसेवर बंदीची मागणी केली. बिहारच्या सर्वपक्षीय नेत्यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर चौकशी करण्यासाठी दबाव वाढवण्यात यश मिळवलं आहे. बिहारी नेत्यांच्या या आरोपांना गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मात्र कडक शब्दात उत्तर दिलं. ' कोणी बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही. अशा प्रसंगी पोलीस दल किती सक्षमपणे वागू शकतं, याचं उदाहरण पोलिसांनी घालून दिलं 'असं ते म्हणाले.बिहारी नेत्यांच्या या राजकारणावर प्रतिक्रिया देताना मराठीचा मुद्दा शिवसेनेचा असल्याचं सांगायला मनोहर जोशी विसरले नाहीत. स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. एकंदरीतच या प्रकरणानंतर बिहारी नेत्यांनी केंद्रावर कारवाईसाठी दबाव आणायला सुरुवात केली आहे. आता या मुद्यावर महाराष्ट्रातले सर्वपक्षीय नेते एकत्र येतात की, आपआपल्या सोयीची भूमिका घेऊन राजकारण करतात, हे लवकरच स्पष्ट होईल.

close