पंतप्रधानांनी गिलना खडसावले

September 24, 2010 3:59 PM0 commentsViews: 2

24 सप्टेंबर

कॉमनवेल्थ गेम्समधल्या ढिसाळ नियोजनावर पंतप्रधानांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. क्रीडामंत्री गिल यांना त्यांनी कॅबिनेटमध्ये गेम्सबाबत प्रेझेंटेशन करण्यापासून रोखले.

कामात टाळाटाळ करणार्‍या लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. कॉमनवेल्थ आयोजनाची जगभरात बदनामी झाल्यामुळे पंतप्रधानांनी आपल्याच सहकार्‍यांना खडसावले आहे. आता चर्चा थांबवा आणि कामावर लक्ष द्या, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

केंद्रीय क्रीडामंत्री एम. एस. गिल यांनी यापूर्वी आपल्या वक्तव्यांनी कॉमनवेल्थ गेम्सच्या तयारीत होत असलेल्या हलगर्जीपणाचे गांभीर्य कमी केले होते. देशाच्या क्रीडामंत्र्यांसारखे वागायला शिका या शब्दांत त्यांना पंतप्रधानांनी खडसावले.

मंगळवारी नेहरू स्टेडियमजवळचा ओव्हरब्रिज कोसळण्याच्या घटनेमुळे खेळाडूंमध्ये सुरक्षेबद्दल भीती निर्माण झाली. त्यावर अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे पंतप्रधानांनी नगरविकास जयपाल रेड्डी यांना दिले आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित मंत्रालय आणि संस्था यांच्यातील समन्वयाच्या अभावावर पंतप्रधानांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान म्हणाले,

'एकमेकांना दोष देण्याची वेळ आता संपली आहे. आता एक देश, एक खेळ आणि एक सरकार हे सूत्र लक्षात ठेवा'. कॉमनवेल्थमध्ये घडणार्‍या सर्व चुकांसाठी कलमाडी यांना दोष देण्याच्या प्रयत्नांबद्दलही त्यांनी गिल यांना खडसावले.

कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे अध्यक्ष माईक फेनेल यांनी गेम्स व्हिलेजमधील अस्वच्छतेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी कॅबिनेट सेक्रेटरींची भेट घेतली. आणि गेम्स व्हिलेजच्या स्वच्छतेसाठी योग्य मदत करण्याची मागणी केली.

कॉमनवेल्थ गेम्स हा केवळ कलमाडींपुरताचा मुद्दा नाही. तर जागतिक महासत्तेचं स्वप्न पाहणार्‍या भारताच्या अस्मितेचा तो प्रश्न आहे.

त्यामुळेच अगदी शेवटच्या क्षणी पंतप्रधानांनी यात स्वत: लक्ष घातले आहे. त्यातून आता सगळे वाद बाजूला पडून स्पर्धा सुरळीत पार पडतील, अशी आशा आहे.

close