कल्याण-डोंबिवलीची जबाबदारी नाईक, राणेंकडे

September 25, 2010 2:18 PM0 commentsViews: 6

अजित मांढरे, अमेय तिरोडकर, मुंबई

25 सप्टेंबर

नेत्यांमधल्या मतभेदांमुळे शिवसेनेला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचारात आघाडी घेता आलेली नाही. तर दुसरीकडे, मनसे फॅक्टर आणि मतांच्या गणिताचा विचार करत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं नारायण राणे आणि गणेश नाईक यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळेच या पूर्वाश्रमींच्या शिवसैनिकांच्या नेतृत्वाशी दोन हात करून येथीली सत्ता कायम ठेवण्याचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वार्डांच्या मतदारसंघांमधून एकही आमदार शिवसेनेला निवडून आणता आला नाही. तसेच मनसेचेही जाळे चांगलेच पसरले आहे. त्यात ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांवरील खड्‌ड्यांमध्ये शिवसेनेची गाडी जाम झाली आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुढे आले आहेत. सुरूवातीला निवडणुकीच्या कामात पुढाकार घेणारे खासदार संजय राऊत अचानक बाजूला झाल्याची चर्चा आहे. राऊत स्वत: बॅकफूटवर गेले की, त्यांना माघारी परतण्यास पक्षाने भाग पाडले, हे कार्याध्यक्षांच्या बोलण्यातूनही स्पष्ट होत नाही.

पण दुसरीकडे, काँग्रेस- राष्ट्रवादीने या निवडणुकीसाठी जोरात तयारी केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला येथील 48 वॉर्डांमध्ये मताधिक्य मिळाले. त्यामुळे मनसे फॅक्टर तसेच येथील मालवणी आणि आगरी मतांचा विचार करून आघाडीने नारायण राणे आणि गणेश नाईक यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

केवळ कल्याण-डोंबिवलीतच नाही तर, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही नारायण राणे भारी पडू शकतात. त्यामुळेच चिंटू शेखच्या प्रकरणात शिवसेनेचे नेते विशेष लक्ष घालत आहेत, अशी चर्चा आहे.

close