तेजस्वीनी सावंतकडून अपेक्षा

September 28, 2010 10:55 AM0 commentsViews: 8

गोविंद वाकड, पुणे

28 सप्टेंबर

महाराष्ट्रासाठी यंदाचं कॉमनवेल्थ खास असणार आहे. महाराष्ट्राच्या तेजस्वीनी सावंतने नुकतीच वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय नेमबाजांची कामगिरी नेहमीच लक्षवेधी ठरत आहे. अभिनव बिंद्रा, राजवर्धन सिंग राठोड, गगन नारंग, अंजली भागवत आणि सुमा शिरुर यांनी नेमबाजीत भारताला अनेक मेडल्स मिळवून दिली आहेत. आणि आता यात आणखी एका नावाची भर पडली आहे. ती म्हणजे, कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतची.

म्युनिक वर्ल्ड शूटींग चँपियनशिपमध्ये तेजस्विनीने गोल्ड मेडल पटकावले. अशी कामगिरी करणारी तेजस्विनी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. साहजिकच या कामगिरीनंतर तिच्याकडून अपेक्षाही वाढल्या आहेत.

दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्ससाठीच्या भारतीय शूटिंग टीममध्ये तेजस्विनी सावंतचा समावेश आहे. आणि किमान चार गोल्ड मेडल पटकावण्याची अपेक्षा ती बाळगून आहे. पुण्यातील बालेवाडीत तेजस्विनीने गेले एक महिनाभर सराव केला आहे. आणि आता शूटिंग टिमबरोबर ती कॉमनवेल्थसाठी गेम्स व्हिलेजमध्ये दाखल झाली आहे.

2006च्या मेलबर्न कॉमनवेल्थ स्पर्धेत तेजस्विनीने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सिंगल आणि डबल्समध्ये गोल्ड मेडल पटकावले होते. आणि आताही तेजस्विनीचा नेम असेल, तो फक्त गोल्ड मेडलवर. या स्पर्धेत भरीव कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे ध्येय महाराष्ट्राची ही सुवर्णकन्या बाळगून आहे.

close