पुण्यात मोठा जमीन घोटाळा उघड

September 28, 2010 3:26 PM0 commentsViews: 18

अद्वैत मेहता, पुणे

28 सप्टेंबर

पुण्यात एक मोठा जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. पुण्यातील सरकारी आणि लष्करी मालकीची 107 एकर जमीन परस्पर खाजगी मालकांच्या नावावर नोंदवल्याचे उघड झाले आहे. येरवडा आणि लोहगाव येथील ही जमीन आहे. ती तीन खासगी मालकांच्या नावावर नोंदवली गेली आहे. विभागीय आयुक्तांनी आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

येरवडा आणि लोहगाव इथे जवळपास 107.66 एकर सरकारी जमीन असल्याच्या नोंदी आहेत. काही ठिकाणी ह्या जमिनी संरक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. 1931 पासून म्हणजे ब्रिटीश राजवटीपासूनच सरकारी आकारी पड अशी ह्या जमिनीची नोंद आहे. 2008-09 ला येरवड्यातील जमीन जयंत वसंतलाल व्यास आणि पेरसी कैखुभू बिलीमोरिया यांच्या नावावर करण्यात आली.

लष्कराला 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर ही जमीन देण्यात आली. तर लोहगावमधली जमीन लक्ष्मीदास रावजी तेरसी यांच्या नावावर आहे. ती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित आहे. विभागीय आयुक्तांनी आता यात लक्षात घातले आहे.सरकारी किंवा लष्करी जमीन खासगी नावावर करण्यासाठी महसूल विभाग किंवा राज्य सरकारची परवानगी आवश्यक असते. पण इथे तसे काहीच घडले नाही.

कनिष्ठ अधिकार्‍यांनी ह्या नोंदीत फेरफार केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जागरुकतेमुळे हे प्रकरण उघडकीला आले आहे. पुण्यात जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्यात तब्बल 500 कोटी रुपयांच्या बाजाराभावाच्या सरकारी भूखंडाचा हा नवा घोटाळा चक्रावून टाकणारा आहे.

close