छबडीबाईंचा पहिला नंबर!

September 29, 2010 8:37 AM0 commentsViews: 2

दीप्ती राऊत, टेंभली, नंदुरबार

29 सप्टेंबर

नंदुरबार जिल्ह्यातील टेंबली या आदिवासी गावात पंतप्रधानांनी आज युनिक आयडेंटीफिकेशन कार्ड्सच्या वाटपाचा शुभारंभ केला. टेंभलीच्या सरपंच छबडीबाई सोनावणे यांच्यासह 10 रहिवाशांना आधार कार्ड देण्यात आले. या कार्डामुळे सरकारी योजनेतील सर्व त्रुटी दूर होतील, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

नंदुरबार जिल्ह्यातील टेंभलीतील गावकर्‍यांसाठी आज उत्सवाचा दिवस होता. पंतप्रधान आणि सोनिया गांधी येणार, तसेच भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ आपल्या गावापासून होणार म्हणून गावात उत्साह होता.

पारंपरिक आदिवासी नृत्याने पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि त्यांच्यासोबत आलेल्या पाहुण्यांचे टेंभलीकरांनी स्वागत केले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया आणि या योजनेचे शिल्पकार नंदन निलेकणी यांच्या उपस्थितीत टेंभलीच्या 10 रहिवाशांना पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्या हस्ते युनिक आयडेंटीफिकेशन कार्डचे वाटप करण्यात आले.

टेंभलीच्या सरपंच छबडीबाई सोनावणे यांना आधारच्या पहिल्या कार्डचा मान मिळाला. आधारमुळे सरकारच्या सर्व योजनांमधील त्रुटी दूर होतील आणि याचा थेट लाभ लोकांना मिळेल, असा विश्वास सरकारला आहे.

पंतप्रधान येणार म्हणून टेंभलीचा चेहरामोहरा झपाट्यानं पालटला. विकासाचे हे चित्र यापुढेही कायम राहावे, अशी टेंभलीकर आणि परिसरातील गावकर्‍यांची इच्छा आहे.

close