अनधिकृत बांधकामांवर ठाण्यात फिरणार बुलडोझर

September 29, 2010 10:17 AM0 commentsViews: 4

अजित मांढरे, विनय म्हात्रे, ठाणे

29 सप्टेंबर

हायकोर्टाच्या आदेशामुळे आता ठाणे जिल्ह्यातील 5 लाख अनाधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवला जाणार आहे. 1 ऑक्टो ते 31 डिसेंबर या तीन महिन्यांत महानगरपालिका, कलेक्टर, वनविभाग यांच्याकडून कारवाई केली जाणार आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ऐन निवडणुकीच्या काळात हा हातोडा पडणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे नेते धास्तावले आहेत.

कल्याण-डोबिवली महानगरपालिकेत पाच वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेना भाजपला आता ही कारवाई त्रासदायक ठरु शकते. तर राज्यात सत्ता भोगणार्‍या काँगेस आणि राष्ट्रवादीलाही या प्रश्नावर मतदारांच्या संतापाचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. पण या सर्व प्रकरणात आता मनसे आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात एकूण 77 हजार 214 अनधिकृत बांधकामे आहेत. यापैकी वनविभागाच्या 167 हेक्टर जागेवर 3027 बांधकामे आहेत. 350 हेक्टर सरकारी जमिनीवर 1 हजार 637 चार मजली इमारती उभ्या राहिल्या तर महापालिका क्षेत्रात 72750 अनधिकृत बांधकामे आहेत. ही बांधकामे अनधिकृत होती, तर मग आम्हाला त्यात वीज आणि पाणी कनेक्शन का देण्यात आली, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

एकंदरीतच अनधिकृत बांधकामांचा विषय कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत तापणार असे दिसते.

close