कॉमनवेल्थमध्ये चांगल्या कामगिरीचा निर्धार

October 1, 2010 2:18 PM0 commentsViews: 4

दिग्विजय सिंग देव, दिल्ली

1 ऑक्टोबर

कॉमेनवेल्थ स्पर्धेचे काऊंटडाऊन आता सुरू झाले आहे. सगळ्या भारतीय टीम्स सध्या दिल्लीत सराव करत आहेत. जिमनॅस्टिक्सची टीमही यात मागे नाही.

कॉमनवेल्थसारख्या स्पर्धेत बरेचसे खेळाडू पहिल्यांदाच खेळत आहेत. या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

जिमनॅस्टिक्स हा सोपा खेळ नक्कीच नाही. समोरील प्रात्यक्षिके बघून तुमच्या हे लक्षात आले असेल. पण मयंक श्रीवास्तवने मागची 20 वर्षे या खेळावर अपार मेहनत घेतली आहे.

या आधीच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत तर भारताचे प्रतिनिधित्व करणारा तो एकमेव जिमनॅस्ट होता. पण यावेळी तो टीममधील सगळ्यात सीनिअर आणि अनुभवी जिमनॅस्ट असेल.

कॉमनवेल्थ सारखी स्पर्धा दिल्लीत होत आहे. त्यामुळे जिमनॅस्टिक्ससारख्या एरवी दुर्लक्षित खेळाला भारतात थोडीतरी प्रसिद्धी मिळेल, असे त्याला वाटत आहे.

असाच एक जिमनॅस्ट रोहीत जयस्वाल. सीमा सुरक्षा दलात तो सब इन्सपेक्टर आहे. पण जिमनॅस्टिक्स हे त्याचे पहिले प्रेम आहे.

आणि गेली 16 वर्षे कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न धरता तो स्वत:वर मेहनत घेत आहे. या खेळात भारतात त्याला फारशी संधी नव्हतीच.

शिवाय ट्रेनिंग सुविधाही नव्हत्या. पण आता कॉमनवेल्थच्या निमित्ताने आपले कौशल्य त्याला जगाला दाखवता येणार आहे. आणि स्वत:ला आजमावताही येणार आहे.

जिमनॅस्टिक्समध्ये तंदुरुस्तीचा खरा कस लागतो. तसेच दुखापतीची शक्यताही जास्त आहे. भारतात या खेलाचं नॅशनल ट्रेनिंग सेंटर नाहीए.

पण कॉमनवेल्थ स्पर्धेमुळे बराच फरक पडलाय. जिमनॅस्टना रशिया, बेलारुस आणि फ्रान्समध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते.

त्यामुळे यंदा खेळाडूंचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. आणि पुढच्या काही वर्षात जिमनॅस्टिक्समध्ये आपल्याला मेडल मिळू शकेल असा विश्वास आता वाटू लागला आहे.

यंदा आर्टिस्टिक आणि रिदमिक जिमनॅस्टिक्स मिळून एकूण 17 जणांची भारतीय टीम कॉमनवेल्थमध्ये उतरणार आहे.

close