नाल्यांचे प्रवाह बदलण्याचा मुद्दा पुण्यात ऐरणीवर

October 1, 2010 2:52 PM0 commentsViews: 2

प्राची कुलकर्णी, अद्वैत मेहता, पुणे

1 ऑक्टोबर

पुण्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडवल्यानंतर नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह बदलल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महापालिका आयुक्तांनी बिल्डर लॉबीने बुजवलेल्या नाल्यांची, नाल्यांवरच्या अतिक्रमणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडून करण्याची भूमिका वारंवार मांडली. या मागणीला महापालिकेतील विरोधी पक्षांनी पाठींबा दिला असला तरी सत्ताधार्‍यांनी मात्र चौकशीची मागणी फेटाळून लावली आहे.

पुण्यात 29 ऑक्टोबरच्या रात्री पावसाने हाहाकार उडाला. रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले. सोसायट्यांच्या संरक्षक भिंती पाडून पाणी घरांमधे घुसले. काही जणांना प्राण गमवावे लागले. अनेक वाहने वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले.

पण दोष केवळ मुसळधार पावसाचा नाही तर नैसर्गिक नाल्यांवर झालेली अतिक्रमणे, नाल्यांचा प्रवाह वळवणे, नालेच गायब करणे हे प्रमुख कारण आहे. यासंदर्भात निवृत्त न्यायाधीशांतर्फे चौकशी करण्याची आग्रही भूमिका महापालिका आयुक्तांनी मांडली. भाजप शिवसेनेनही ही मागणी उचलून धरली.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि स्थायी समितीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मात्र महापालिका अधिकार्‍यांनी दबाव झुगारून कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना चौकशीची मागणी फेटाळून लावली आहे.

बिल्डर लॉबीचे राजकीय लागेबांधे पाहता पालिका अधिकारी कारवाई करणार का, आणि चौकशी झालीच तर दोषींवर कारवाई होणार का, हे प्रश्न अनुत्तरीतच राहतात. त्यामुळे पुण्यातील नैसर्गिक नाले मोकळा श्वास घेणार का, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

close