डोंबिवलीत खड्डे बुजवण्याची धावपळ

October 1, 2010 5:19 PM0 commentsViews: 7

अमेय तिरोडकर, अजित मांढरे, डोंबिवली

1 ऑक्टोबर

कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. गेल्या पाच वर्षात सत्ताधार्‍यांनी काय केले, याचा जाब आता जनता विचारत आहे. रस्त्यांतील खड्डे ही सर्वात महत्वाची समस्या इथे आहे. यामुळे कल्याण-डोंबिवलीकर अक्षरक्ष: वैतागले आहेत.कल्याण- डोंबिवलीतील सर्वच रस्त्यांची अवस्था रस्त्यांत खड्डे की खड्‌ड्यात रस्ते, अशी आहे.

कल्याण- डोंबिवलीतील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, असे पत्र राष्ट्रपतींनी एक वर्षापूर्वी कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेच्या आयुक्तांना लिहिले होते. पण त्या पत्राला केराची टोपली दाखवली गेली. आणि आता निवडणुकीच्या तोंडावर कल्याण- डोंबिवलीतील सर्व रस्त्यांवर खड्डं बुजवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

कारण सत्ताधार्‍यांना जाणीव झाली आहे, की जर हे खड्डे बुजवले नाहीत तर, कल्याण-डोंबिवलीची जनता आपली सत्ता याच खड्‌ड्यांमध्ये बुजवेल.

डोंबिवलीतील एका जागरुक नागरिकाने मेलद्वारे राष्ट्रपतींना कल्याण- डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्‌यांची परिस्थिती सांगितली होती. पण त्याची दखल कोणीच घेतली नाही. आणि आता महापालिका खड्‌ड्यात जाण्याची वेळ आली, तेव्हा सगळेच खडबडून जागे झाले. ऑस्ट्रेलियन पद्धत वापरुन 24 तास काम करुन रस्त्यांवरील खड्डे बुजवले जात आहेत.

रस्त्यांवर पडलेल्या खड्‌ड्यांमुळे मनसेने मोठे आंदोलन केले होते. सत्ताधारी तर सोडाच, पण विरोधकांनाही खड्डे बुजवायला जमले नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस याचा फायदा उचलते का, ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

close