मृत व्यक्ती झाली गावची सरपंच!

October 5, 2010 9:56 AM0 commentsViews: 2

शेखलाल शेख, संजय वकरड, औरंगाबाद

5 ऑक्टोबर

मृत व्यक्ती गावाची सरपंच झाल्याचे आपण कधी ऐकले आहे का? पण औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील लोहगावात मात्र हा चमत्कार घडला आहे. येथील आशाबाई लक्ष्मण रुपेकर या महिलेने आसराबाई लक्ष्मण रुपेकर या मृत महिलेच्या नावाने निवडणूक लढवली आणि ती निवडूनही आली… विशेष म्हणजे निवडणूक अधिकार्‍यांनीही याकडे दुर्लक्ष केले.

28 वर्षांच्या आशाबाईने आसराबाई लक्ष्मण रूपेकर या 73 वर्षांच्या मृत महिलेचा मतदार क्रमांक वापरला. आशाबाईचा अर्ज वैध ठरवताना मतदार यादीतील क्रमांक, मूळ नाव आणि वयातील फरक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या लक्षातच आला नाही का, असा सवाल त्यांच्या प्रतिस्पर्धी निर्मला सिरसाट यांनी केला आहे.

आशाबाई लक्ष्मण रुपेकर यांनी निवडणुकीसाठी दिलेल्या कागदपत्रांतील नावात मोठी तफावत आहे. मात्र आता येथील पुढारी आणि उपसरपंच बचाव्याच्या पवित्र्यात आहेत.

सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याचा फायदा आशाबाई लक्ष्मण रुपेकर यांनी घेतला. त्यांना साथ मिळाली गावातील पुढार्‍यांची. त्यामुळे आज आसराबाई लक्ष्मण ही मयत असणारी महिला आशाबाईच्या नावाने जिवंत होऊन गावाचा कारभार पाहत आहे…

close