ईद पार्टीची इमारत बेकायदेशीर

October 5, 2010 3:11 PM0 commentsViews: 5

सुधाकर कांबळे, मुंबई

5 ऑक्टोबर

गृहमंत्री आर. आर. पाटील हे गुन्हेगारांसोबत ईद पार्टीत दिसल्याने मोठी खळबळ उडाली होती.

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष नसीम सिद्दीकी यांनी त्यांच्या भायखळा येथील घरी ही पार्टी आयोजित केली होती.

पण आता सिद्दीकी यांचे घर ज्या इरफान पॅलेस या इमारतीत आहे, ती इमारतच बेकायदेशीर असल्याचे उघड झाले आहे.

या बिल्डिंगला अजूनही ओसी अर्थात राहण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याची माहिती 'आयबीएन-लोकमत'ला मिळाली आहे.

यामुळे इथे राहत असलेले राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष नसीम सिद्धीकी हे बेकायदेशीर इमारतीत राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्य म्हणजे या इरफान पॅलेस या इमारतीविरोधात म्हाडाकडे अनेक तक्रारी गेल्या आहेत.

येथील बेकायदेशीर कार्य पद्धतीबाबत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

याच इमारतीच्या 17व्या मजल्यावर राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष नसीम सिद्धीकी राहतात.

आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ही इमारत कायदेशीर आहे.

इरफान पॅलेस या इमारतीचा विकास म्हाडाच्या 33(7) या योजनेनुसार झाला आहे.

अर्थात सेस इमारतीबाबत या नियमानुसार विकास होत असतो.

या नियमानुसार इमारतीत राहणार्‍या मूळ रहिवाशांचे प्रथम पुर्नवसन करणे आवश्यक असते.

तसेच जोपर्यंत मूळ रहिवाशांना त्यांचे हक्क मिळत नाहीत, तोपर्यंत म्हाडाचे अधिकारी ओसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असलेले एनओसी देत नाहीत.

यामुळे जोपर्यंत म्हाडाची एनओसी मिळत नाही तोपर्यंत पालिकेची ओसी मिळत नसते. आणि जोपर्यंत ओसी मिळत नाही, तोपर्यंत इमारतीत राहता येत नाही.

या बेकायदेशीर बिल्डिंगमध्ये राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष राहतत. तर राज्याच्या गृहमंत्र्यांसोबत याच बेकायदेशीर बिल्डिंगमध्ये काही गुन्हेगारही दिसतात.

यामुळे या बेकायदेशीर इमारतींना अभय देणार्‍या सगळ्याच सरकारी यंत्रणांमधील भ्रष्टाचार या निमित्ताने उघड झाला आहे.

close