आरटीओतील गैरप्रकारांविरोधात याचिका

October 6, 2010 12:04 PM0 commentsViews: 5

गोविंद तुपे, मुंबई

6 ऑक्टोबर

आरटीओच्या ऑफिसमधून बोगस लायसन्स देणे, हा काही आता नवीन प्रकार राहिलेला नाही.

आता मात्र या गैरप्रकारांच्या विरोधात लोकांनी कोर्टात धाव घेतली आहे.

प्रशांत साने यांना ही धक्कादायक गोष्ट समजली आहे, ती माहितीच्या अधिकारामुळे.

त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली 200 जणांची माहिती मिळवली. अजय मोरया या तरूणाची कागदपत्रेही त्यातलीच.

ही कागदपत्रे बोगस आहेत. कारण अजय मोरयाने ड्रायव्हींग लायसन्स मिळवण्यासाठी पुरावा म्हणून लाईट बील जोडले, ते चेंबूरच्या अनिल शेट्टी यांचे.

पण अनिल शेट्टींनी मात्र आपण त्याला ओळखतच नसल्याच्चे एका पत्रात म्हटले आहे.

हे सर्व गौडबंगाल लक्षात आल्यानंतर साने यांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली होती.

त्यावर कोर्टाने आरटीओला काम जमत नसेल तर घरी बसा, अशा शब्दात फटकारले आहे.

तसेच परिवहन खात्याचे आयुक्त दिलीप जाधव यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

परंतू या सर्व प्रकरणात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लायसन्स घेण्यासाठी येणार्‍या व्यक्तीच्या कागदपत्र तपासली जात नाहीत.

एवढेच नाही तर कोणतीही कागदपत्रे न जमा करताही काही पैसे मोजले की लायसन मिळते.

त्यामुळे यामध्ये अधिकारी आणि एजंट यांचे साटे लोटे असल्याचा आरोप याचिकाकर्ते करत आहेत.

बोगस लायसन्स मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रे तर दिली जातातच.

पण बोगस लायसन्सचा महत्वाच्या कामांसाठी पुरावा म्हणून वापर केला जात आहे.

देशाच्या सुरक्षेसाठीही ही गोष्ट धोकादायक ठरू शकते, पण आरटीओच्या अधिकार्‍यांच्या मात्र ही गोष्ट लक्षात येत नाही.

close