अनधिकृत बांधकामांचे खापर एकमेकांवर

October 7, 2010 2:46 PM0 commentsViews: 6

मनोज देवकर, ठाणे

7 ऑक्टोबर

ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांवर आता कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पण ज्यांच्या काळात ही अनधिकृत बांधकामे झाली ते सत्ताधारी शिवसेना – भाजप आता राज्य सरकारवर खापर फोडत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सत्ताधारी शिवसेनेलाच यासाठी जबाबदार धरले आहे.

हायकोर्टाच्या आदेशानंतर ठाणे जिल्ह्यातल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू झाली आहे. सरकारी तसेच खाजगी जागांवरची अतिक्रमणे हटवली जात आहेत. पण या अनधिकृत घरांना वीज आणि पाण्याची कनेक्शन्स का, देण्यात आली? असे सवाल आता घराचे छत हरवलेले लोक विचारू लागले आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत या मुद्याचा फटका बसू शकतो, या भीतीने आता शिवसेना आणि भाजपने राज्य सरकारवर खापर फोडत, स्वत:ची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

एकीकडे शिवसेनेचे नेते कारवाईच्या ठिकाणी पोहोचून काही प्रयत्न केल्याचे दाखवत आहेत, तर घर गमावलेल्या लोकांनी मीडियाशी न बोलण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते करत आहेत.

ठाणे जिल्ह्यात एकूण पाच लाख अनधिकृत बांधकामे आहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण ही बांधकामे अनधिकृत आहेत याची माहितीच नसलेल्या सामान्यांना आता त्याची किंमत मोजावी लागत आहे.

आणि या परिस्थितीला जबाबदार असलेले सर्वच राजकीय नेते मात्र फक्त कारवाईला विरोध करण्यात मग्न आहेत.

close