ओमरच्या वक्तव्याने आणखी एक वादळ

October 7, 2010 3:43 PM0 commentsViews: 2

मुफ्ती इस्लाह, आशिष दीक्षित

7 ऑक्टोबर

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तेथील राजकारणात आणखी एक वादळ निर्माण केले आहे. जम्मू-काश्मीर भारतात विलीन झाले नाही, तर ते एका करारानुसार भारतात सामील झाले, असे वक्तव्य ओमर यांनी काल विधानसभेत केले होते. त्यांच्या या विधानावर भाजप आणि पँथर्स पार्टीच्या आमदारांनी आज सभागृहात प्रचंड गदारोळ घातला.

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या वादग्रस्त विधानानंतर जम्मू काश्मीरच्या विधानसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. भाजप आणि पँथर्स पार्टी यांची मागणी आहे, की मुख्यमंत्र्यांनी आपल्या विधानाचे स्पष्टीकरण द्यावे. बुधवारी मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले होते, की काश्मीर भारतात सामील झाले असले तरी विलीन झालेले नाही.

26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीरचे महाराजे हरी सिंग आणि भारताचे गव्हर्नर जनरल यांनी स्वाक्षरी केलेल्या 'इंस्टं्रुमेंट ऑफ ऍक्सेशन' या तहाअंतर्गत जम्मू आणि काश्मीर भारतात 'सामील' करण्यात आले होते. पण नंतर विलीनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी करण्यास काश्मीरने नकार दिला होता. त्यामुळे ओमर यांचे वक्तव्य तांत्रिक दृष्ट्या बरोबर असले, तरी त्याच्या टायमिंगमुळे फुटीर गटांना शक्ती मिळण्याची शक्यता आहे. भाजपने आता पुन्हा ओमर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ओमर यांच्या विधानामुळे विधानसभेच्या आत जशी निदर्शने झाली, तशी बाहेरही झाली. काश्मीरमध्ये आधीच गेल्या वर्षभरात जोरदार निदर्शने सुरू आहेत. अशा नाजूक परिस्थितीत ओमर अब्दुल्लांच्या विधानाने भारतविरोधी भावनेला बळ मिळेल, असा भाजपचा आरोप आहे. काश्मीरमध्ये नॅशन कॉन्फरन्ससोबत सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसने मात्र यावर आपली भूमिका स्पष्ट केली नाही.

close