भारताची गोल्ड कमाई सुरुच

October 8, 2010 9:06 AM0 commentsViews: 1

8 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ गेम्समधील भारताची गोल्ड मेडलची कमाई सुरुच आहे.

शूटिंगमध्ये भारताने अजून एक गोल्ड मेडल पटकावले आहे. 25 मीटर रॅपीड फायर पिस्तुल प्रकारात भारताच्या विजय कुमारने ही कामगिरी केली आहे. भारताचा गुरूप्रित सिंगही या प्रकारात चांगली कामगिरी करत ब्राँझ मेडल खिशात घातले.

दिवसातील दुसरे गोल्ड

भारताने आजच्या दिवसातील दुसरे गोल्ड मेडल जिंकले. शूटिंगमध्ये 50 मीटर थ्री पोझीशन पेअर्समध्ये भारताच्या गगन नारंग आणि इम्रान खान यांनी गोल्डवर कब्जा केला आहे. गोल्ड पटकावताना त्यांनी नवीन कॉमनवेल्थ रेकॉर्डही केला.

याआधी गगन नारंगने 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक गटात गोल्ड मेडल्स जिंकली होती. तसेच अभिनव बिंद्रासोबत एअर रायफल पेअर्समध्येही त्याने नवीन गेम रेकॉर्डसह गोल्ड पटकावले होते.

तिरंदाजीत गोल्ड

तिरंजदाजीमध्ये भारतीय महिलांनी गोल्ड मेडल्सवर कब्जा केला आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी तिरंदाजीच्या रिकर्व टीम फायनलमध्ये भारतीय महिलांनी इंग्लंड टीमचा 207-206 असा पराभव केला. पण शेवटच्या तीन बाणात इंग्लंडच्या महिलांचा नेम चुकला आणि भारताला गोल्ड मेडल मिळाले.

सोमदेव फायनलमध्ये

कॉमनवेल्थच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सोमदेव देव बर्मनने पुरूष एकेरीच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमी फायनलच्या मॅचमध्ये टॉप सीड सोमदेवने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू ऍब्डेनचा पराभव केला.

फायनलमध्ये धडक मारल्यामुळे टेनिसमधील सिल्व्हर मेडल तरी पक्के झाले आहे. सोमदेवने मॅथ्यूचा 6-3, 6-1 असा सहज पराभव करत फायनल गाठली.

महिला कुस्तीत मेडल्स पक्की

कॉमनवेल्थ गेम्सच्या महिलांच्या कुस्ती स्पर्धेत भारताची अजून दोन मेडल्स पक्की झाली आहेत. 67 किलो वजनी गटाच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या अनिताने स्कॉटलंडच्या ऍक्लीया मॅक्‌मॅनसचा पराभव केला. आणि फायनलमध्ये प्रवेश केला.

तर दुसरीकडे 51 किलो वजनी गटात बबिता कुमारीने फायनलमध्ये प्रवेश केला. भारताला महिला कुस्तीतील पहिले-वहिले गोल्ड मिळवून देणार्‍या गीताची बबिता ही बहीण आहे.

close