दसरा मेळाव्यात होणार युवासेनेची घोषणा

October 8, 2010 12:31 PM0 commentsViews: 6

विनोद तळेकर, मुंबई

8 ऑक्टोबर

यावेळचा दसरा शिवसेनेसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर शिवसेनेच्या एका नव्या संघटनेची घोषणा होणार आहे.

यंदा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार का? या चिंतेत असणार्‍या शिवसैनिकाला दसर्‍या निमित्त एक वेगळी भेट मिळणार आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासह ताज्या दमाच्या काही तरूण नेत्यांना घेऊन शिवसेना आपल्या नव्या युवासेना या संघटनेची घोषणा या दसर्‍याला करणार आहेत.

युवासेना ही मुख्य प्रवाहाच्या बरोबरीने म्हणजेच शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या बरोबरीने तरुण वर्गात काम करणार आहे.

यासाठी आदित्य ठाकरेंच्या जोडीला श्वेता परूळकर, अभिजीत पानसे, विजय कदम, या संघटनात्मक पातळीवरच्या तरूण नेत्यांसोबत संतोष सांबरे, अभिजीत अडसूळ यांच्यासारखे तरूण आमदार देखील देण्यात आले आहेत.

विद्यार्थीदशेतून बाहेर पडलेला आणि पक्षाच्या मूळ प्रवाहात न आलेला तरूण हा या युवासेनेचा टार्गेट असेल.

पक्षात स्वत:चे नेतृत्व तयार करताना उद्धव ठाकरेंना ज्या अडचणी आल्या, तसेच वरिष्ठ नेत्यांशी जुळवून घेत स्वत:ची टीम तयार करायला जो वेळ लागला, तसा त्रास आदित्यला होऊ नये, म्हणून आतापासूनच हालचालींना सुरुवात झाली आहे.

भविष्यात जेव्हा आदित्य ठाकरे शिवसेनेची सूत्रे हातात घेतील, त्यावेळी आपली धोरणे राबवताना या युवासेनेच्या रुपात त्यांच्याकडे स्वतःची एक टीम असेल.

close