प्रदूषण रोखणारी युद्धनौका नौदलात दाखल

October 9, 2010 2:28 PM0 commentsViews: 14

9 ऑक्टोबर

आज भारतीय कोस्ट गार्डच्या ताफ्यात समुद्रातील प्रदूषण रोखणारी पहिली युद्धनौका सामील झाली आहे. आयसीजीसी समुद्र प्रहरी असे या युद्धनौकेचे नाव आहे. ही सुरतच्या एबीजी या शिपयार्डमध्ये बनवण्यात आली आहे.

94 मीटर लांब आणि 14.5 मीटर रुंद असलेल्या या युद्धनौकेचे वजन आहे 4300 टन… ताशी 21 नॉट्स म्हणजे 37 किलोमीटर ते जास्तीत जास्त 45 नॉट्स म्हणजे 81 किलोमीटर या युद्धनौकेचा वेग आहे. तर 20 दिवस पुरेल इतकी साधनसामग्री या बोटीवर आहे.

या युद्धनौकेवर अत्याधुनिक संपर्क यंत्रणा आहे. त्याप्रमाणेच रेस्क्यूऑपरेशनसाठी 5 हायस्पीड बोटी आणि 4 वॉटर स्कूटर या युद्धनौकेवर असणार आहेत. या युद्धनौकेचे मुख्य काम आहे, ते भारताची आर्थिक ताकद असलेल्या बंदरामधील प्रदूषण रोखणे. विशेष करून तेल घेऊन जाणार्‍या मोठ्या मालवाहू जहाजातून होणार्‍या तेलगळतीमुळे समुद्रात पसरणारे तेल तवंग रोखणे.

ज्यामुळे समुद्रातील पर्यावरणाची मोठी हानी होते. नुकतेच मुंबईच्या किनार्‍यावर चित्रा या जहाजामुळे पसरलेल्या तेल तवंगामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला होता.

समुद्र प्रहरी युद्धनौका समुद्रातील प्रदूषण रोखण्याबरोबरच किनार्‍यांच्या सुरक्षेसाठी गस्त घालणे तसेच समुद्रात कुठल्याही बोटींवर लागणार्‍या आगी विझवण्यासाठी फायर ब्रिगेडची भूमिकाही बजावणार आहे.

close