पुण्यात राजकारण्यांनी लाटली 130 एकर जमीन

October 9, 2010 2:56 PM0 commentsViews: 5

अद्वैत मेहता, पुणे

9 ऑक्टोबर

पुण्याजवळच्या कात्रज- धनकवडी भागातील 130 एकर जमीन राजकारण्यांनी लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. या परिसरातील शेतकर्‍यांनी याविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय केला आहे. पुण्यातील बिल्डर राजेंद्र बर्‍हाटे यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीवरून मोठ्या जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे.

धनकवडी आणि कात्रज येथील 130 एकर जमीनीवरची शेतकर्‍यांची नावे कमी करून तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी 1952 साली या जागी मोठे हॉस्पिटल बांधण्याचे आदेश दिले. त्यामुळे जमिनीवर टीबी सॅनिटोरीयम अशी नोंदही झाली. पण काही कालावधीनंतर या जागेपैकी 20 एकर जागेवर कात्रज दूध डेअरीचे बांधकाम सुरू झाल्याने मूळ मालक असलेल्या शेतकर्‍यांना संशय आला. डॉ. गणेश धडफळे यांनी या विरोधात कोर्टात धाव घेतली.

दरम्यान या जमिनीवर अकारीपड अशी नोंद झाल्याने धूर्त राजकारण्यांनी जागा लाटल्या. पतंगराव कदम यांच्या भारती विद्यापीठासह या जमिनीवर 1980 नंतर मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल, कात्रज दूध डेअरी, पीआयसीटी कॉलेज, रणजीत सिंह मोहिते पाटलांचे विजय फाऊंडेशन, पीएमपी कात्रज डेपो अशा इमारती उभ्या राहिल्या. पतंगराव कदमांनी जमीन कशी लाटली, याचा पुरावाच सादर करण्यात आला आहे.

ज्यांच्या मूळ जमिनी होत्या त्या शेतकर्‍यांनी आता आपल्याला जमिनी परत मिळवण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

कात्रज डेअरीच्या 20 एकरांपैकी रिकाम्या 5 एकर जागेवरून सुरू झालेले पतंगराव कदम आणि अजित पवारांचे भांडण कोर्टात सुरू आहे. तर दुसरीकडे बड्या राजकारण्यांच्या ताब्यातील या जमिनी लवासा प्रकरणाप्रमाणे नियमीत करण्याचा आटापिटा सरकारी पातळीवर सुरू आहे.

close