कल्याण-डोंबिवलीत उत्सुकता मनसेची

October 11, 2010 12:34 PM0 commentsViews:

विनोद तळेकर, मुंबई

11 ऑक्टोबर

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर व्हायला सुरूवात झाली आहे. काही दिवसांत प्रचाराची राळही उठेल. या प्रचारात सर्वांचे लक्ष असेल, ते आक्रमक अशा मनसेवर.

आपल्या पक्षाची उमेदवार यादी जाहीर करताना राज ठाकरे बोलले आणि त्यांच्या या वक्तव्यांमुळे त्यांचे प्रचारातले मुद्दे काय असतील याची थोडीशी कल्पनाही आली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राज यांनी आपला सगळा प्रचार मराठी आस्मिता आणि प्रांतवादाभोवती केंद्रीत केला होता. पण कल्याण डोंबिवलीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरे पायाभूत सुविधा आणि सत्ताधार्‍यांचे अपयश या मुद्द्यावर अधिक जोर देणार आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीत 'मनसेला मत म्हणजे काँग्रेसला मत' असा प्रचार शिवसेना आणि भाजपने केला होता. त्यावरही राज या प्रचारात उत्तर देतील, असे कळते. त्याचबरोबरच या प्रचारात राज यांचा पहिला हल्ला असेल, तो भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्यावर.

काही दिवसांपुर्वी मुनगंटीवार यांनी मनसेवर 'पवारांची टेस्टट्यूब पार्टी' अशी टीका केली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी राज या प्रचार सभांचा वापर करतील. तसेच एकूणच काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील अपयशी पक्ष ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी राज ठाकरे धडाकेदार प्रचार करतील अशीच चिन्ह आहेत.

close