कॉमनवेल्थमध्ये भारताचा आजचा दिवस थंड

October 11, 2010 2:03 PM0 commentsViews: 7

11 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ गेम्समध्ये आजचा दिवस भारसाताठी अतिशय थंड राहिला. भारताला आज फक्त एक मेडल मिळवता आले आणि तेही शूटिंगमध्ये. शूटिंगमध्ये महिलांच्या 50मीटर रायफल प्रोन पेअर प्रकारात भारताला ब्राँझवर समाधान मानावे लागले.

तेजस्विनी सावंत आणि मीना कुमारी या भारतीय ऍथलीट्सना गोल्डचा नेम साधता आला नाही. दोघांनी मिळून 1200पैकी 1168 पॉइंट मिळवले. रायफल थ्री पोझिशन पेअर प्रकारात तेजस्विनीने लज्जा गोस्वामीच्या साथीने ब्राँझ पटकावले होते.

भारताचे शुटिंगमधील हे चौथे ब्राँझ मेडल ठरले आहे. भारताने शूटिंगमध्ये 24 प्रकारात एकूण 25 मेडल्स जिंकलीत. यात 13 गोल्ड आणि 8 सिल्व्हर मेडलचाही समावेश आहे.

थाळीफेकमध्ये नवा रेकॉर्ड

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने नवा रेकॉर्ड रचला आहे. महिलांच्या थाळीफेक प्रकारात तीनही मेडल्स भारतीय खेळाडूंनीच पटकावली आहेत. भारतीय कृष्णा पुनियाने 61.15 मीटरची नोंद करत गोल्ड मेडल पटकावले. तर हरवंत कौरने 60.16 मीटरवर थाळी फेकत सिल्व्हर मेडलची कमाई केली. तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या सीमा अंतीलने ब्राँझ मेडल पटकावले.

बॉक्सर्ससाठी संमिश्र दिवस

कॉमनवेल्थ गेम्सचा आठवा दिवस भारतीय बॉक्सर्ससाठी संमिश्र ठरला आहे. बॉक्सिंगची फायनल गाठणारा सूरंजॉय हा पहिला भारतीय ठरला आहे. 52 किलो वजनी गटात सूरंजॉयने पाकिस्तानच्या हरून इक्बालचा पराभव केला. एकतर्फी झालेला सेमी फायनलचा हा बाऊट सूरंजॉयने 9-3 असा सहज जिंकला. तर मनोज कुमारनेही 64 किलो वजनी गटाची फायनल गाठली. मनोज कुमारने बहामाजच्या वॅलिंटीनो नॉवेल्सचा 3-1नं पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.

सायना फायनलमध्ये

बॅडमिंटनमध्ये भारतासाठी एक खूष खबर आहे. वर्ल्ड नंबर 3 सायना नेहवालने स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली आहे. नॉर्दन आयर्लंडच्या कॅरोलीन ब्लॅकचा तिने 21-0, 21-2 ने फडशा पाडला.

मॅच जिंकण्यासाठी सायनाला 15 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला. या स्पर्धेत सायनाला टॉप सिंडिंग मिळाले. आता विजेतेपदासह गोल्ड मेडल मिळवण्यासाठी ती प्रयत्नशील असेल. क्वार्टर फायनलमध्ये तिची गाठ कॅनडाच्या ऍना राईसशी पडणार आहे.

close