माणिकरावांना दिल्लीचे अभय

October 16, 2010 12:51 PM0 commentsViews: 6

16 ऑक्टोबर

वादात सापडलेल्या, माणिकराव ठाकरेंवर तूर्तास कारवाई होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज 10 जनपथवर झालेल्या बैठकीत माणिकराव-चतुर्वेदी संभाषणावर चर्चा झाली.पण त्याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे समजते.

या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी ए. के. अँटोनी, सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल आणि ऑस्कर फर्नांडिस यांनी, सोनिया गांधींना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची माहिती दिली.

केंद्रीय कार्यकारिणीची शिफारस

काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीवर महाराष्ट्रातून कुणाची वर्णी लावली जावी, याबाबतची शिफारस यादी आज अध्यक्षा सोनिया गांधी यांना सुपूर्द करण्यात आली. तसेच प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारणीवरील नावांची शिफारस यादीसुद्धा सोनिया गांधींना सादर करण्यात आली आहे.

याखेरीज प्रदेश काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकांबाबतचा अहवालदेखील 10 जनपथवरील बैठकीत सोनियांना सादर करण्यात आला. केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष ऑस्कर फर्नांडिस आणि प्रदेश काँग्रेसचे मुख्य निवडणूक अधिकारी गुलचैनसिंह चरक यांनी सोनियांशी प्रदेश काँग्रेसमधील संभाव्य फेरबदलाबाबत चर्चा केली.

दोन्ही शिफारस याद्या आणि अहवालावर शेवटचा हात फिरवताना माणिकराव ठाकरे यांना विश्वासात घेण्यात आले नाही, अशी माहिती मिळाली आहे.

विलासरावांचा टोला

एखादा राजकीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षात निधी हा गोळा केला जातो. पक्षातील एका व्यक्तीवरून पक्षाची संस्कृती ठरवता येत नाही, असे म्हणत केंद्रीय अवजय उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी माणिकराव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला हाणला आहे.

माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेला झेंडा मार्च यशस्वी झाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे का? असा प्रश्न विचारताच, विलासरावांनी थेट उत्तर न देता, यावर माणिकराव ठाकरे आता बोलतील…कारण आता ते मोकळे झालेत, असे खोचक उत्तर दिले. त्याचबरोबर झेंडा मार्चसाठी गोळा करण्यात आलेल्या निधीचेही त्यांनी समर्थन केले. ते लातूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

close