दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच

October 16, 2010 1:55 PM0 commentsViews: 15

विनोद तळेकर, मुंबई

16 ऑक्टोबर

येत्या रविवारी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच साजरा होणार आहे. कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर शिवसेनेने अगदीच कमी वेळात या मेळाव्याची तयारी सुरू केली आहे. या मेळाव्यातूनच शिवसेना कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ करेल.

एक नेता, एक मैदान आणि एक विचार या तत्वावर गेली 45 वर्ष शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर साजरा होतो. पण यंदा शिवाजी पार्क हे सायलेन्स झोन झाल्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार याच्या चर्चा सुरू झाल्या. अखेर हायकोर्टाकडून परवानगी मिळवत सेनेने हा अडथळा पार केला. पण आता त्यांच्यासमोर आव्हान असेल ते कायद्याच्या चौकटीत राहून सगळ्या नियमांचे पालन करत हा मेळावा यशस्वी करून दाखवण्याचे.

दसरा मेळावा म्हटला की, बाळासाहेबांचे भाषण हा शिवसैनिकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. पण गेली काही वर्ष प्रकृती अस्वास्थामुळे बाळासाहेबांना या मेळाव्याला हजर राहता येत गेल्या वर्षी तर त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधला होता.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बाळासाहेब आपल्या मार्मिक शैलीत काय बोलणार, याचे अंदाज सध्या बांधले जात आहेत. तसेच यंदाच्या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी प्रथमच बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर असतील. कारण शिवसेनेच्या युवासेनेची घोषणा याच व्यासपीठावरून केली जाणार आहे. त्यामुळे एका अर्थाने यंदाचा दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी ऐतिहासिक असाच असणार आहे.

close