परतीच्या पावसाने भाताचे नुकसान

October 19, 2010 2:24 PM0 commentsViews: 30

19 ऑक्टोबर

गेल्या तीन – चार दिवसांपासून खेडसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार वादळी पाऊस झाला आहे.

यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतात कापणीसाठी तयार झालेले भाताचे पीक पूर्णत: जमीनदोस्त झाले आहे.

यंदाच्या मोसमात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी होते. मात्र कापणीची वेळ होऊन गेली तरीही पावसाने विश्रांती घेतलेली नाही.

त्यामुळे संपूर्ण शेतात उभे असलेले तयार भातपीक सडले आहे. हवालदिल झालेला शेतकर्‍याला मदतीची अपेक्षा आहे.

पण प्रशासनाने अजूनही ना कोणता पंचनामा केला, ना अजूनही कुणाला मदत मिळाली. यामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

रायगडमध्ये पावसाचा जोर

दोन दिवसांपासून रायगडमध्येही परतीच्या पावसाने जोर धरला आहे. यामुळे कापणीसाठी तयार झालेल्या भातशेतीचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी कापणीला सुरुवात होऊन शेतामधून लोंब्या आडव्या रचून ठेवल्या होत्या. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे त्या गळून पडल्या.

त्यामुळे शेतकर्‍यांच्या हातात निराशाच आली आहे. या वर्षीच्या चांगल्या पावसामुळे भातशेती जोरात होती. पण नंतर पावसाने विश्रांतीच दिली नाही.

त्यामुळे पिकांना आवश्यक ऊनही मिळाले नाही. त्यात आता ऐन कापणीच्या वेळी पावसाचा फटका बसल्याने शेतकरी धास्तावला आहे.

close