मुख्यमंत्री चव्हाणांचा राजीनामा

October 30, 2010 12:23 PM0 commentsViews: 3

30 ऑक्टोबर

अखेर आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज आपला राजीनामा सोनिया गांधींकडे दिला. 10 जनपथवर झालेल्या बैठकीत सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अशोक चव्हाण यांनी स्वत: ही माहिती दिली.

आता या राजीनाम्यावर सोनिया गांधी निर्णय घेणार आहेत. चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

हायकमांडकडून गंभीर दखल

हायकमांडने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तातडीने द्विसदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती फक्त अशोक चव्हाण यांचीच नव्हे तर आदर्श सोसायटीच्या मंजुरीच्या काळात 1999 पासून जे जे मुख्यमंत्री होते त्यांची सर्वांची चौकशी करणार आहे.त्यामुळेच सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांचीही चौकशी होणार आहे.

याशिवाय माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि यांच्यासारख्या सर्व प्रमुख राजकीय नेत्यांच्या सहभागाची चौकशी केली जाईल. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी तसेच केंद्राचे संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांची ही समिती आहे.

ए. के. अँटोनी हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी म्हणूनही कार्यभार सांभाळतात. लवकरच ते आपला अहवाल हायकमांडना सादर करतील आणि अशोक चव्हाण यांचे भवितव्य दोन नोव्हेंबरच्या आधी निश्चित होणार आहे.

ज्याच्या टेबलावर फाईल त्याला फ्लॅट…

राजकारणी, त्यांचे नातलग, प्रशासकीय अधिकारी ज्यांच्या ज्यांचा टेबलवर आदर्श सोसायटीची फाईल गेली त्यांना फ्लॅट मिळाले. अशोक चव्हाण यांच्या शिवायही अनेक मंत्र्यांनी शिफारशी करुन निकटवर्तीयांना फ्लॅट्स मिळवून दिले आहेत. या शिफारशींची यादी 'आयबीएन-लोकमत'कडे आहे…त्यावर एक नजर टाकूयात…

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख – सुशीला शाळीग्राम आणि सुनीला सेठी

नारायण राणे- रुपाली रावराणे आणि गिरीश मेहता

पतंगराव कदम – बाळासाहेब सावंत

अजित पवार – शिवाजीराव काळे, कृष्णराव भेगडे आणि जितेंद्र आव्हाड

जयंत पाटील – आदित्य पाटील ( पुतणे )

आर. आर. पाटील – चंद्रशेखर गायकवाड

अनिल देशमुख – मुकुंदराव मानकर

कन्हैयालाल गिडवाणी – कविता गोडबोले

महत्वाचे म्हणजे या प्रकरणाची फाईल सोळा ठिकाणी फिरली. त्या सोळा ठिकाणी बिदागी म्हणून फ्लॅट बहाल करण्यात आला.

close