इरम शर्मिलेच्या उपोषणाला दहा वर्षं पूर्ण

November 2, 2010 5:31 PM0 commentsViews: 3

02 नोव्हेंबर

ईशान्य भारतातून लष्कराचा विशेषाधिकार काढून घ्यावा, यासाठी शर्मिला गेल्या 10 वर्षांपासून उपोषण करत आहे. अन्न आणि पाण्याचा तिने त्याग केला आहे. गेल्या दहा वर्षांपासून ती सलाईनवर जगत आहे. पण तिने आपला लढा मात्र थांबवला नाही.

व्हिटॅमिन आणि न्यूट्रिएन्टसचे डोस देऊन तिला जिवंत ठेवण्यात आले आहे. दिवसातून दोन वेळा तिला नाकाद्वारे जबरदस्तीने हे डोस दिले जातात. आधुनिक काळातली गांधीविचारांची सत्याग्रही इरम शर्मिला अतिसुरक्षित कैदी आहे.

काहीवेळा ती दिल्लीत असते. पण कायमस्वरुपी ती इम्फाळमध्येच असते. पण दहावर्षांपूर्वी 28 वर्षांच्या तरुणीला ऐतिहासिक उपोषणाला सुरुवात करण्यासारखे काय घडलं?

2 नोव्हेंबर 2000 आसाम रायफल्सच्या एका पोस्टवर अतिरेक्यांनी हल्ला चढवला. त्याला प्रत्युत्तर देताना लष्कराने केलेल्या कारवाईत मालोममधल्या या बस स्टँडवर 10 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हादरलेल्या शर्मिलाने उपोषण सुरू केले.

राज्य सरकारने शर्मिलावर आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. आणि तिला इम्फाळमधल्या या जवाहरलाल नेहरू हॉस्पिटलमध्ये ठेवले. गेल्या दहा वर्षांत तिचा बराचसा काळ इथंच गेला आहे.

शर्मिला, गांधींजींच्या मार्गाने सत्याग्रह करत आहे. तिच्या या लढ्याला इतिहासात तोड नाही. पण गेल्या दहा वर्षांत तिच्या आईने आपल्या मुलीची भेटही घेतली नाही.

आणि तिला भीती वाटते आपला कमजोरपणा बघून आपल्या शूर मुलीला त्रास होईल. पण शर्मिलाचा लढा मात्र सुरूच आहे. एक ना एक दिवस परिस्थिती बदलेले, अशी तिला खात्री आहे..

close