अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत ओबामांना धक्का

November 3, 2010 5:44 PM0 commentsViews: 10

03 नोव्हेंबर

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या स्वागताची जय्यत तयारी भारतात सुरू आहे. पण अमेरिकेतच ओबामा यांना मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दोन वर्षांच्या आतच ओबामा यांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली. काल झालेल्या मध्यावधी निवडणुकीच्या मतदानातून त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

सिनेट आणि प्रतिनिधीगृहात रिपल्बिकन पक्षाने डेमोक्रॅटिक पक्षाला मोठा धक्का दिला आहे.

भारतीय वंशाची पहिल्या महिला गव्हर्नर

भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिकही या निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी निक्की रंधवा हॅली यांनी निवडणूक जिंकली. आणि साऊथ कॅरोलिनाच्या पहिल्या महिला गव्हर्नर बनण्याचा मान मिळवला आहे.

निक्की यांचे आईवडील अमृतसरहून अमेरिकेत स्थलांतरीत झाले होते. अमेरिकतल्या एखाद्या राज्याची गव्हर्नर बनणार्‍या निक्की या दुसर्‍या भारतीय आहेत.

त्यांच्यापूर्वी बॉबी जिंदाल यांनी हा मान मिळवला आहे. क्लेमसन विद्यापीठातून निक्की यांनी अकाऊंटींगमध्ये पदवी मिळवली आहे.

भारताला पाठिंबा ?

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा येत्या शनिवारी भारताच्या दौर्‍यावर येत आहे. या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी पहिली मुलाखत दिली.

त्यात ओबामांनी भारतासाठी कोणते ही आश्वासन दिले नाही. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायस्वरुपी सदस्यत्व मिळवण्यासाठी अमेरिकेने पाठिंबा द्यावा, ही भारताची मागणी आहे.

पण असा पाठिंबा देणे खूपच गुंतागुंतीचे असल्याचे ओबामांनी म्हटले आहे. आऊटसोर्सिंग आणि अमेरिकन तंत्रज्ञानाचे हस्तांतरण याबाबतही ओबामांनी सकारात्मक भूमिका घेतलेली नाही.

close