भारत-पाक संबंध सुधारण्याचा ओबामांनी जागवला आशावाद

November 7, 2010 10:14 AM0 commentsViews: 7

7 नोव्हेंबर, मुंबई

भारतभेटीच्या दुस-या दिवशी भारत आणि पाकिस्तानमधले संबंध सुधारण्याचा आशावाद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामांनी जागवला. पाकिस्तानमध्ये स्थैर्य आणि शांतता नांदणं महत्त्वाचं असल्याचं मतही त्यांनी मांडलं. दक्षिण मुंबईतल्या सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये ओबामा पत्नी मिशेलसह विद्यार्थ्यांना भेटले. यावेळी विद्यार्थ्यांच्या बेधडक प्रश्नांना उत्तरं त्यांनी दिली.

अमेरिकेसाठी पाकिस्तान इतका महत्वाचा का आहे. अमेरिका या देशाला दहशतावादी राष्ट्र का घोषित करत नाही ? असा प्रश्न विचारला असता ओबामा म्हणाले- 'मी अशी आशा करतोय की भारत आणि पाकिस्तान देशांतील संवाद वाढेल. वादग्रस्त मार्गावर चर्चेनं पर्याय निघू शकतो. पण त्यासाठी आम्ही भारत आणि पाकिस्तानवर दबाव आणू शकत नाही. पाकिस्तानला सांगू इच्छितो की आम्हाला शांततामय आणि स्थिर पाकिस्तान हवंय. अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी आम्हाला पाकिस्तानची मदत हवी आहे. या अतिरेक्यांकडून पाकिस्तानलाही देशांतर्गत धोक्याची कल्पना आहे. पाकिस्तान हा विलक्षण देश आहे. पण तिथं मोठी सामाजिक आणि आर्थिक दरी आहे. पकिस्तानी सरकार सजग आहे. त्यांना तिथल्या प्रश्नांची योग्य जाणीव आहे. पण दहशतवादाविरोधात पाकिस्तानची लढाई धीम्या गतीने आहे.'

'अफगाणिस्तानात आम्हाला शांतता नांदवण्यासाठी इराक मॉडेल राबवायचाय.हे काम एकट्यानं शक्य नाही. यासाठी आम्हाला पाकिस्तानची मदत गरजेची आहे. अफगाणिस्तानातून आम्ही तुर्तास तरी संपुर्णपणे फौजा मागे घेऊ शकत नाही. इराकच्या धर्तीवर अफगाणिस्तानातील समस्येकडे बघता येईल. स्थिर आणि शांततामय अफगाणिस्ताण नजिकच्या काळात शक्य आहे. इस्लाम हा जगातील शांत आणि महान धर्म आहे. मुठभर धार्मिक कट्टर वाद्यांना त्यांच्या वाईट हेतूपासूंन आपण रोखलं पाहिजे.

महात्मा गांधीजींची जीवन मुल्य तुम्ही तुमच्या आयुष्यात कशी राबवता या प्रश्नावर उत्तर देताना ओबामा म्हणाले- 'मी नेहमीच दुस•यांमध्ये मला शोधण्याचा प्रयत्न करतोय. दुस-याचा आत्मसन्मान जपण्याचा माझा नेहमीचा प्रयत्न असतो. पण दैनंदिन जीवनात कधीकधी या मुल्यांचं आचरण करण्यात मी कमी पडतोय याची मला जाणीव आहे.'

21 व्या शतकात भारत आणि अमेरिका अधिक सक्षम राष्ट्र बनू शकतील. आणि मैत्री अधिक दृढ होईल अशी आशा बराक ओबामांनी व्यक्त केली. तसंच 26 /11 च्या हल्ल्यात मुंबईकरांनी दाखवलेल्या स्पिरीटबद्दल त्यांनी मुंबईकरांचं कौतुक केलं.

सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यापूर्वी बराक ओबामा यांनी इथं भरलेल्या कृषी प्रदर्शनीला भेट दिली. देशातल्या कृषी उद्योजकांनी आपली देशी उत्पादनं आणि तंत्रज्ञान प्रदर्शनात मांडली होती. ओबामांनी उद्योजकांशी आणि शेतक-यांशी मुक्त संवाद साधला. सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. याच ठिकाणी त्यांनी राजस्थानमधल्या शेतक-यांशी व्हिडिओ कॉनफर्न्सिंग द्वारे संवाद साधला. ओबामांचं अजमेरच्या शेतक-यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालं. यावेळी त्यांनी गावांना प्रगतीचं केंद्र बनवण्याचं आवाहन केलं. इथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट देतानाच बराक ओबामांनी एका ठिकाणी एका स्टॉलवर संदेशही दिला. त्यानंतर ओबामांनी घेतला मुंबईकरांचा निरोप घेतला आणि ते मुंबई एअरपोर्टवरून दिल्लीकडे रवाना झाले.

close