हल्ले थांबले नाही तर त्या शहरात रेल्वे बंद करू – लालुप्रसाद यादव

October 30, 2008 11:04 AM0 commentsViews: 13

30 ऑक्टोबर, दिल्लीसुमीत पांडेउत्तर भारतीयांवरचे हल्ले थांबले नाहीत तर ज्या शहरात हल्ले होतील, तिथली रेल्वेसेवा बंद करण्यात येईल, असा धमकीवजा इशारा रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी दिला आहे. खोपोलीत लोकलमध्ये उत्तर भारतीय तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर लालुंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. या प्रश्नावर बिहारच्या नेत्यांनी कधी नव्हे ती एकी केली आहे. मुंबईत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये महाराष्ट्राचे दिल्लीतील नेते काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर हल्ले होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आधी सर्वपक्षीय बिहारी नेते एकत्र आले. आता उत्तर प्रदेशातील सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. युपीए सरकारला धारेवर धरत या नेत्यांनी आता महाराष्ट्राबाबत कडक भूमिका घेतली जावी, अशी मागणी केली आहे. लालूंनी तर रेल्वे परीक्षा महाराष्ट्राबाहेर घेण्याच्या घोषणेनंतर आता उत्तर भारतीयांवर वाढत चाललेले हल्ले थांबले नाही तर ज्या शहरातल्या रेल्वेमध्ये हल्ले केले जातील, त्या शहरातील रेल्वेसेवा बंद केली जाईल, अशी धमकीच दिली आहे.बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी पंतप्रधानांशी याबाबत संपर्क साधला आहे. लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान आणि मुलायमसिंग यादव या केंद्र सरकारच्या घटक पक्षातील नेत्यांनीही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे. बैठकीत उत्तर भारतीय नेते याच मुद्यावर आक्रमक राहणार आहेत तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आघाडी सरकार असल्यानं केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close