मालेगाव बॉम्बस्फोटात आतापर्यंत 5 अटकेत

October 30, 2008 11:13 AM0 commentsViews: 5

30 ऑक्टोबर, नाशिकदीप्ती राऊतमालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपींची संख्या आता पाचवर पोहचली आहे. माजी लष्करी अधिकारी रमेश उपाध्याय आणि समीर कुलकर्णी यांना नाशिक कोर्टानं 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. निवृत्त मेजर रमेश उपाध्याय हे अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत तर समीर कुलकर्णी हा अभिनव भारतचा प्रचारक आहे. दरम्यान, मालेगावचा बॉम्बस्फोट हिंदुत्ववादी संघटनांनी केला असेल, तर आतापर्यंत झालेल्या बॉम्बस्फोटांची ती प्रतिक्रिया समजावी, असं खळबळजनक विधान ' अभिनव भारत ' च्या राष्ट्रीय अध्यक्षा हिमानी सावरकर यांनी केलं आहे.नाशिक कोर्टात सुनावणीच्यावेळी समीर कुलकर्णी यानं यावेळी वकील नाकारला तर निवृत्त मेजर उपाध्याय यांनी स्वत:च त्यांची बाजू मांडली. साध्वी प्रज्ञासिंग हिच्यासोबत आपण एकदा बोललो होतो तसंच तीन वेळा एकाच व्यासपीठावर होतो, याची कबुली त्यांनी दिली. मात्र कटातला सहभाग नाकारला. या तपास कामात पोलिसांना पूर्ण सहकार्य करेन, पण पोलीस कोठडी देण्यात येऊ नये, अशी विनंती त्यांनी कोर्टापुढे केली. पण, या आरोपींचे प्रज्ञासोबत स्फोटाबाबतचं बोलणं झाल्याचं समोर येत असल्याचं सरकारी वकिलांनी मांडल्यानं न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी दिली.दरम्यान, समीर आणि उपाध्याय यांची बाजू मांडत ' अभिनव भारत ' संघटनेनं पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली. ' समीर आणि रमेश उपाध्याय हे सच्चे हिंदू आहेत. आम्ही दहशतवादाविरोधात काम करतो. मालेगाव स्फोटात हिंदुत्ववादी संघटनांचा हात असले तर आतापर्यंतच्या बॉम्बस्फोटाची ती प्रतिक्रिया समजावी ', अशी स्फोटक प्रतिक्रिया ' अभिनव भारत ' संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा हिमानी सावरकर यांनी दिली.साध्वी प्रज्ञाप्रमाणेच समीर आणि उपाध्याय या दोन्ही आरोपींच्या नार्को अ‍ॅनॅलिसिस, पॉलीग्राफी आणि ब्रेनमॅपिंग या सायंटिफिक टेस्ट करण्यात येणार आहेत. या आरोपींच्या बोलण्यात नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झालेल्या बैठकीचा उल्लेख आल्याचं पहिल्यांदाच अधिकृतकपणे यावेळी कोर्टात मांडण्यात आलं. स्फोटात वापरलेलं आरडीएक्स कुठून आलं, कसं आलं, त्यापासून बॉम्ब कसा तयार केला, यात आणखी कोणाचा सहभाग होता तसंच दुसर्‍या शहरांमध्ये झालेल्या स्फोटांसोबत यांचा काय संबंध आहे, या दिशेनं पुढील तपास होणार आहे.

close