जागतिक मंदीचा अंडरवर्ल्डला फटका

October 30, 2008 11:21 AM0 commentsViews: 6

30 ऑक्टोबर,मुंबईजिथे पैसा पाण्यासारखा येतो असं म्हटलं जातं, त्या अंडरवर्ल्ड मध्येच आता मंदी आली आहे. त्याचा परिणाम म्हणून अंडरवर्ल्डमधील अनेक लोकांना त्यांचा पगार मिळत नाही. जागतिक बाजारात आलेल्या मंदीचा फटका यास कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं आहे. माहिती देणार्‍या टीपरना त्यांचे ठरलेले पैसे वेळच्या वेळी मिळत नाही. शौकत गुर्गा (नाव बदललं आहे) म्हणाला ' भाईला फोन केला की, सांगतात पैसे मिळतील. एक-दोन महिने वाट पहा. सगळ्यांचे पैसे मिळतील. पण इकडे हालत ही आहे, की काम करायला पण पैसे नाहीत. 'अंडरवर्ल्डमध्ये आलेल्या मंदीमुळे शौकत सारखी अनेकांची परिस्थिती आहे. भाईला पैसा पोचवणार्‍यांनाही आता काही काम उरलं नाही. त्याचा परिणाम म्हणजे त्यांचं उत्पन्न घटलंय. त्यामुळे त्यांच्यावर असलेले खटले लढायला पैसा आणायचा कुठून, हा प्रश्न त्यांना पडला आहे. अस्लम (नाव बदललं आहे) म्हणाला, ' माझं काम होतं, भाई सांगेल तिथून पैसे उचलणं. पण आता कोणी पैसेच देत नाही. माझा पगारही बंद आहे. माझे कुटुंबीय उधारीवर पैसे उचलून माझी केस लढवत आहेत '. जो जितका मोठा टीपर त्याला अधिक पैसे दिले जातात. जर टीपरने गँगसाठी मोठं काम केलं तर, त्याला महिन्याला 30 ते 35 हजार रुपये. जर चार -पाच कामं केलीत तर 25 ते 30 हजार आणि जो नवा आहे त्याला 8 ते 10 हजार रुपयेअसा पगार दिला जातो. जर पोलिसांनी पकडलं तर, वकिलाची फी आणि वरती पाच हजार रूपये ज्यादा दिले जातात आणि जर एखादा टीपर पोलीस चकमकीत मारला गेला तर कुटुंबाला 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते आणि दर महिन्याला 5 हजार रूपये पन्शनही पोचवलं जातं. अंडरवर्ल्डमधील बराचसा पैसा हा शेअर मार्केटमधून जातो. सध्या मार्केट कोसळलं आहे. त्यामुळे खंडणीसाठी शेअर मार्केटमध्ये हे भाई जे कॉल्स करायचे, त्यांची संख्याही आता कमी झाल्याचं इथले पोलीस अधिकारी सांगतात. एका जमान्यात या शूटर्स आणि टीपरना लाखो रूपये अय्याशी करण्यासाठी दिले जात. पण आता त्यांना महिन्याचा पगार देणंही अवघड बनलं आहे.

close